केरळच्या रणांगणावर तारकांचा झगमगाट; सुरेश गोपी, गणेशकुमार, मुकेश मैदानात

Ganeshkumar-Suresh-Gopi
Ganeshkumar-Suresh-Gopi

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये सध्या प्रचाराचा राजकीय ज्वर शिगेला पोचला आहे, यंदा विविध राजकीय पक्षांनी सिनेतारकांना  मैदानामध्ये उतरविले असून यामध्ये मोठ्या पडद्यावरील कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचा देखील समावेश आहे. सध्या ही मंडळी सर्वच पक्षांकडून आक्रमक प्रचार करत मतदारांना आकर्षित करताना दिसतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपकडून थ्रिसूर मतदारसंघातून राष्ट्रीय पुरस्कारविजेते अभिनेते आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश गोपी यांना उमेदवारी देण्यात आली असून डाव्या पक्षांकडून विद्यमान आमदार असणारे के.बी.गणेशकुमार आणि मुकेश हे दोघेही पथानापुरम आणि कोल्लम मतदारसंघातून भवितव्य आजमावत आहेत. सुरेश गोपी यांनी आतापर्यंत दोनशे चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचे ओरू वडक्कम, वीरगाथा, थलस्थानम, एकलव्य आणि पात्रम हे चित्रपट विशेष गाजले होते. त्यांनी याआधी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक देखील लढविली होती पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. याखेपेस ते विधानसभेच्या रणधुमाळीत स्वतःचे भवितव्य आजमावत आहेत. केरळ काँग्रेसचे नेते आर. बालकृष्णन पिल्लई यांचे पुत्र आणि माजी मंत्री गणेशकुमार यांनी २००१ मध्ये राजकारणात उडी घेतली होती. गणेशकुमार यांनी के.जी. जॉर्ज यांच्या इराकल या चित्रपटातून १९८५ मध्येच सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. मागील अनेक वर्षांपासून पथानापुरममधून निवडणूक जिंकणाऱ्या गणेशकुमार यांनी या खेपेस देखील आपणच विजयी होऊ असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

बघू लढून
पार्श्वगायिका दालिमा जोजो या आरूर या मतदारसंघातून डाव्या आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत. येथे त्यांची लढत यूडीएफच्या शानिमोल उस्मान यांच्याशी आहे. अभिनेत्री प्रियांका अनूप या देखील अपक्ष उमेदवार म्हणून अरूरमधूनच निवडणूक लढवीत आहेत. अभिनेते विवेक गोपा हे चावरामधून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. आतापर्यंत तमिळनाडूप्रमाणे केरळमध्ये सिनेतारकांना जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही पण याखेपेस मात्र सर्वांनीच बघू लढून अशी भूमिका घेतल्याचे दिसून येते.

मुकेश यांना विजयाचा विश्‍वास
दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रम आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले मुकेश यांनीही आपण दुसऱ्या वेळेस विजयी होऊ असा दावा केला आहे. अभिनेते जी.कृष्णकुमार (तिरूअनंतपुरम) आणि धर्मराजन बोलागट्टी (बालूस्सेरी) हे दोघेही अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. डाव्या आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये सहभागी होणारे पालाचे आमदार मनी सी कप्पन हे देखील पूर्वीच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. कप्पन यांनी २५ चित्रपटांमध्ये काम केले असून बारा चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com