Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांना नारळ?; दुसऱ्या यादीतूनही डावलले

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 October 2019

उमेदवारी यादीतून संबंधितांना 'मेसेज' देऊन त्यांची तिकिटे कापण्याचा लोकसभा निवडणुकीवेळी दिसलेला अमित शहा पॅटर्न विधानसभेच्या वेळीही दिसत आहे. 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव या यादीत नाही.

उमेदवारी यादीतून संबंधितांना 'मेसेज' देऊन त्यांची तिकिटे कापण्याचा लोकसभा निवडणुकीवेळी दिसलेला अमित शहा पॅटर्न विधानसभेच्या वेळीही दिसत आहे. बुधवारी 14 जणांची नावे जाहीर केल्याने भाजपने आता 139 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित सात उमेदवारांची नावे उद्या दुपारपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे.

अक्षरशः दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या गोपीचंद पडळकरांना बारामतीतून, मुंदडा यांना केजमधून, तर गोपालदास अग्रवाल यांना गोंदियातून तिकीट दिले आहे. मात्र, मुळातच भाजपचे कार्यकर्ते असलेले, गेली अनेक वर्षे पक्ष संघटनेसाठी योगदान दिलेल्या वरील तिन्ही नेत्यांना ज्या पद्धतीने बाद करण्यात आले आहे, याबद्दल अनेक कारणे पक्षातर्फे सांगितली जात आहेत.

विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये आक्षेप होता. खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागल्यावर मुख्यमंत्री आणि इतरांविरुद्ध सतत जी विधाने केली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. 

बावनकुळे यांच्याबाबत संघ परिवारातून काही तक्रारी आल्या होत्या. आपले तिकीट कापले जाणार याची कुणकुण लागल्यामुळेच बावनकुळे केंद्रीय निवडणूक समितीच्या 29 तारखेच्या बैठकीलाही भाजप कार्यालयात आले होते. बैठक सुरू असताना ते बाहेर भाजप कार्यालय परिसरात बसले होते. बावनकुळे यांना कामठी ऐवजी काटोल या मतदारसंघात अनिल देशमुख यांच्या विरोधात लढवले जाण्याची शक्यता आहे. कामठीत दलित नेत्या सुलेखा कुंभारे यांना संधी दिली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- Vidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी 

- Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे उद्या भरणार उमेदवारी अर्ज; शक्तिप्रदर्शन करणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadse Bawankule and Tawde still not get Candidacy from BJP