'क्‍यार' चक्रीवादळाने धारण केले रौद्ररूप; काय होतील भारताच्या किनाऱ्यावर परिणाम?

टीम ई-सकाळ
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

2007मध्ये आलेल्या 'गोनू' चक्रीवादळानंतर बारा वर्षांनी अरबी समुद्रात महाचक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.

पुणे : राज्याच्या किनारपट्टीसह गोव्याला झोडपणाऱ्या "क्‍यार' चक्रीवादळाने आता रौद्ररूप धारण केले आहे. अतितीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढून त्याचे 'सुपर सायक्‍लॉन'मध्ये म्हणजेच महाचक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सध्या त्याचा प्रवास भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर 'ओमान'च्या दिशेने सुरू असल्यामुळे भारताच्या किनाऱ्यावर त्याचा दुष्परिणाम जाणवणार नाही. 2007मध्ये आलेल्या 'गोनू' चक्रीवादळानंतर बारा वर्षांनी अरबी समुद्रात महाचक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.

अबू बगदादी ठार झाल्याचा अमेरिकेचा पुन्हा दावा

क्‍यारच्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या वाऱ्याचा वेग रविवारी (27 ऑक्टोबर) ताशी 230 ते 240 किलोमीटर होता, तो अधिकाधिक ताशी 265 किलोमीटरपर्यंत पोचला. सोमवार (28 ऑक्टोबर) पर्यंत महाचक्रीवादळाची स्थिती अशीच राहणार असून, वाऱ्याचा वेग ताशी 255 ते 265 किलोमीटर आणि अधिकाधिक 290 किलोमीटरपर्यंत पोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ओमानच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाचा तीव्रता मंगळवार (29 ऑक्टोबर) नंतर कमी होण्याची शक्‍यता आहे. 

वादळाचा मच्छिमारांना फटका; जाणून घ्या किती झाले नुकसान

काय झाले वादळाचे परिणाम?
क्यार चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः  कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्या तुलनेत गोव्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दोन दिवसांपूर्वी  गोव्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे हजेरी लावली होती. किनारपट्टी भागातील अनेक झाडे उन्मळून पडली होती. समुद्राची पातळी वाढल्यामुळे पणजी शहरात पाणीच पाणी झालं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kyar become super cyclone arabian sea India west coast Konkan Goa