US Election- निकालाच्या गोंधळात कोरोनाचा कहर; 24 तासांत रुग्णांची विक्रमी वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 6 November 2020

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रण हा चर्चेचा मुद्दा ठरला असला तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रण हा चर्चेचा मुद्दा ठरला असला तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत आज नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. हिवाळ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

मागील 24 तासांत अमेरिकेत कोरोनाचे आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 1 लाख 20 हजार रुग्ण आढळले आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 96 लाखांच्या वर गेली आहे. तर 2.34 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला मिळणारा पगार ऐकला तर...
 
विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द 20 जानेवारीपर्यंत आहे. तोपर्यंतच्या जवळपास 85 दिवसांमध्ये, सरकारने कठोर पावले उचलली नाहीत आणि आवश्‍यक उपाययोजना केल्या नाहीत तर, 1 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा इशारा ग्लोबल हेल्थ संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. रॉबर्ट मर्फी यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार, गेल्या आठवडाभरात अमेरिकेत दररोज सरासरी 86 हजार 352 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांचा मृत्यू होण्याचा दरही 15 टक्क्यांनी वाढून दररोज सरासरी 846 जण दगावत आहेत. 

US Election - पराभवाच्या उंबरठ्यावरही ट्रम्प यांचा विजयाचा दावा; काय आहे गणित?

ट्रम्प यांचे दुर्लक्ष-
शास्त्रज्ञांचा सल्ला धुडकावून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रचार सभा घेतल्या. कोरोना संसर्गाचा अनुभव घेऊनही ते मास्क वापरण्याच्या विरोधात आहेत. बायडेन यांनी मात्र मोठ्या प्रचारसभा घेण्याचे टाळत लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. ते आवर्जून मास्क वापरत असत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in last 24 hour USA found 1 lakh 20 thousand corona cases