esakal | US Election - पराभवाच्या उंबरठ्यावरही ट्रम्प यांचा विजयाचा दावा; काय आहे गणित?
sakal

बोलून बातमी शोधा

trump

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे 264 इलेक्टोरल मते मिळवून आघाडीवर आहेत. त्यांना बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी फक्त 6 मतांची आवश्यकता आहे. तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना फक्त 214 मते मिळाली आहेत. 

US Election - पराभवाच्या उंबरठ्यावरही ट्रम्प यांचा विजयाचा दावा; काय आहे गणित?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये (US Election) यंदाची निवडणूक ही वेगळी ठरत आहे. कोरोनाच्या संकटकाळात झालेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणीवरून केलेले आरोप आणि न्यायालयात घेतलेली धाव, मतमोजणीला होत असलेला विलंब यामुळे निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे. मतमोजणीला सुरुवात होऊन 72 तास झाल्यानंतरही अद्याप राष्ट्राध्यक्ष कोण हे स्पष्ट झालेलं नाही.

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) हे 264 इलेक्टोरल मते मिळवून आघाडीवर आहेत. त्यांना बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी फक्त 6 मतांची आवश्यकता आहे. तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना फक्त 214 मते मिळाली आहेत. तरीही ट्रम्प यांच्याकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतमोजणीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत ट्रम्प न्यायालयात पोहोचले आहेत. त्याआधी निवडणूक निरीक्षकांनी ट्रम्प यांचे आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. आता न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

आता जो बायडेन हे जरी आघाडीवर दिसत असले तरीही अद्याप चार प्रमुख राज्यांमधील मतमोजणी बाकी आहे. यामधील निकालावर बरचसं अवलंबून आहे. जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, एरिझोना आणि नेवाडा यातील तीन राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. तर बायडेन नेवाडामध्ये थोड्या फरकाने पुढे आहेत. जो बायडेन यांना बहुमत मिळवण्यासाठी 6 मतं हवी आहेत. जर बायडेन यांना नेवाडामध्ये विजय मिळाला तर राष्ट्राध्यक्ष पदी ते विराजमान होतील. 

हे वाचा - US Election - ट्रम्प म्हणतात निवडणुकीत चोरी तर बायडेन यांना जिंकण्याचा विश्वास; पण निकाल कधी?

डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, एरिझोना या राज्यात आघाडीवर आहेत. मात्र बायडेन यांच्या तुलनेत आता त्यांची मते कमी होत आहेत. जॉर्जियामध्ये 16 मते आहेत. तर 20 मते असलेल्या पेन्सिल्वेनियामध्येही ट्रम्प आणि बायडेन यांच्या मतांमधील फरक कमी होत असताना दिसत आहेत. दुसरीकडे एरिझोनामध्ये बायडेन आणि ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. याशिवाय अलास्कासह आणखी काही राज्यांमधील मतमोजणी सुरू आहे. तिथं विजय मिळाल्यास ट्रम्प यांना पुन्हा सत्ता काबीज करण्याची संधी मिळू शकते.

हे वाचा - US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला

ट्रम्प सहजपणे पराभव पत्करण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत मतमोजणीमध्ये घोटाळा असल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर तज्ज्ञांनी म्हटलं की, जरी दुसऱ्यांदा मतमोजणी केली तरी ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता कमी आहे. ट्रम्प यांच्याकडून बायडेन यांना ज्या राज्यात कमी आघाडी आहे अशा ठिकाणी मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी केली जात आहे. यामध्ये मिशिगन आणि विस्कॉन्सिनचा समावेश आहे.

loading image
go to top