Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

परंतु एएसआय सर्वेक्षणाच्या निकालावर परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करू नये असे सांगितले.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

गुवाहाटीमध्ये विमानतळाचे छत कोसळले

गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळाचे छत कोसळल्याची घटना घडली आहे.

पुण्यामध्ये शरद पवार साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

येत्या ६ एप्रिल रोजी शरद पवार दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

कंगना रणौतची भूतनाथ मंदिराला भेट

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कंगना रणौत यांनी सोमवारी बाबा भूतनाथ मंदिराला भेट दिली.

 West Bengal : ममता बॅनर्जी यांची वादळग्रस्त भागाला भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादळग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अलीपुरद्वारमध्ये पीडितांचीही भेट घेतली.

हिंगोलीत उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिवसेनेचाच - देवेंद्र फडणवीस

हिंगोलीत उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिवसेनेचाच असून निवडून येईल असा उमेदवार सूचविण्याचे काम आपण करु शकतो. मात्र, महायुतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचाच उमेदवार असेल. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा. मतदारसंघात नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकार्‍यांकडे स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुलढाणा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; भाजपच्या माजी आमदाराकडून अपक्ष अर्ज

बुलढाणा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी, प्रतापराव जाधवांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडून अपक्ष अर्ज भरण्यात आला आहे.

१५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगात दाखल

अबकारी धोरण प्रकरणात दिल्ली न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात आणण्यात आले.

AAP workers hold protest: तिहार तुरुंगाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या दोन क्रमांक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर आंदोलन केले आहे.

Kendrapara Lok Sabha MP Anubhav Mohanty: बीजेडीच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

बीजेडीचे खासदार अनुभव मोहंटे (MP Anubhav Mohanty) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.

Amit Shah: पंडित जवाहरलाल नेहरुंनी मोठी चूक केली होती- अमित शहा

भाजपकडून प्रचारसभांचा धडाका लावण्यात आला आहे. राजस्थानमध्ये एका सभेत बोलताना अमित शाह यांनी जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. जम्मू आणि काश्मीरला कलम ३७० लागू करुन त्यांनी मोठी चूक केली होती, असं ते म्हणाले.

Sanjay Raut: संजय राऊत राजकारणातील गणपतराव पाटील; आशिष शेलारांची टीका

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना अभिनेते जॉनी लिव्हर यांच्याशी केली होती. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे राजकारणातील गणपतराव पाटील आहेत. ठाकरे दिल्लीत मुजरा करायला जातात. संजय राऊतांना सिव्हर ओकचे उंबरे झिजवताना सर्वांनी पाहिलंय, असं ते म्हणाले.

सर्वेक्षणास स्थगिती देण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळा आणि कमल मौला मस्जिदमधील वादग्रस्त स्थळांमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला, परंतु एएसआय सर्वेक्षणाच्या निकालावर परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करू नये असे सांगितले.

"मोहिते-पाटलांनी नकार दिल्यास मी तयार"

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यास मोहिते-पाटलांनी नकार दिल्यास आपण ईच्छुक असल्याचे म्हणत, प्रवीण गायकवाड यांनी लढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांदी दिल्लीत भेट घेतली.

महिन्याला 1, 200 कोटींपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स

“UPI, आज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यासपीठ बनले आहे. याच्या माध्यमातून दर महिन्याला 1,200 कोटींहून अधिक व्यवहार होतात. आता, RBI डिजिटल चलनावर काम करत आहे. आपण एका दशकात नवीन बँकिंग प्रणाली आणि नवीन अर्थव्यवस्थेत प्रवेश केला आहे. गेल्या 10 वर्षात जे काही केले गेले ते फक्त ट्रेलर आहे,” असे पंतप्रधान मोदी मुंबईतील आरबीआयच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

वरच्या वर्गात ढकलणे झाले बंद, पहिली ते आठवीमध्ये होणार नापास

द्रुगधामना, ता. ३१ : वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रकार आता बंद होणार आहे. आता पहिली ते आठवीची परीक्षा होणार आहे. गुणवत्ता नसेल तर यात विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार आहे. मात्र, त्याचा पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या (आरटीई) कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हते. आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे.

कर्जामुळे प्रॉपर्टी डीलर झाला लुटारू, घरात शिरून सोनसाखळी लांबवली

जुगाराच्या सवयीतून २० ते २५ लाखांचे कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी प्रॉपर्टी डीलरने अजनीतील दाम्पत्याला लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. गुन्हेशाखेच्या युनिट चारने त्याला अटक करून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी त्याने बालाजीनगरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात शिरून पतीला जखमी करीत, महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली होती. देवेंद्र नारायण सोनसावरे (वय ३६, रा. सीआरपीएफ कॅम्प, हिंगणा) असे आरोपीचे नाव आहे.

भारतीय बँक व्यवस्था जगात आदर्श- नरेंद्र मोदी 

भारतीय बँक व्यवस्था जगात आदर्श समजली जाते, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआच्या कार्यक्रमात केला.

पत्‍नीला पेटवून पतीने स्वतःही घेतले जाळून पतीचा मृत्यू तर पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू

पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यानंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांवर उपचार सुरू असताना आज, रविवारी पतीचा मृत्यू झाला. राहुल चाफले हे मृताचे नाव आहे. तर पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २९) घडली. पत्नीच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पशुहत्येस विरोध केल्याचा राग, चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल

पाथर्डी, ता. ३१ ः मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मढी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना आज अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना घडली. या वेळी जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यात एका चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्या. देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीच्या बिजीलॅड सेंटरमधील साईनाथ मार्केटिंग येथे मध्यरात्री भीषण आग

अमरावतीच्या बिजीलॅड सेंटरमधील साईनाथ मार्केटिंग येथे मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. विदर्भातील सर्वात मोठे कापड मार्केटमधील साईनाथ मार्केटमध्ये आग लागल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने 2 तासानंतर आग आटोक्यात आली.

भाजपमध्ये सामील होण्यासाठी मिळाली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर

पंजाबच्या लुधियाना दक्षिण येथील आम आदमी पक्षाच्या आमदाराने एफआयआर दाखल केला आहे. आमदार राजिंदरपाल कौर छिना यांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पक्ष सोडण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने (भाजप) देखील पोलिसांना या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याचे आवाहन केले आहे.

महादेव जानकर आज भरणार आपला उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह हे नेते राहणार उपस्थित

महादेव जानकर आज परभणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.

रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी; काय आहे कारण?

रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वंचितकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा पक्षाकडून आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी रमेश बारसकर कार्यरत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ अमेरिकेत कार रॅली

अमेरिका : मेरीलँडमधील शीख अमेरिकन लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ कार रॅली काढली. त्यांनी आपली वाहनं भाजपचे झेंडे आणि अमेरिकेच्या ध्वजानं सजवली होती. शिवाय, त्यांच्या वाहनांवर 'अबकी बार 400 पार, 'तीसरी बार मोदी सरकार' असे फलक लावले होते.

Weather Update : आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात अचानक पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील 24 तासातही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालला वादळाचा तडाखा; पाच जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागांत अचानक आलेल्या वादळामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जखमी झाले. अधिका-यांनी सांगितलं की, जिल्हा मुख्यालय शहराच्या बहुतांश भागात आणि शेजारच्या मैनागुरीच्या अनेक भागात गारपिटीसह जोरदार वाऱ्यामुळं अनेक झोपड्या आणि घरांचं नुकसान झालं, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले आहेत.

शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

कास / महाबळेश्‍वर : तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात (Shivsagar Reservoir) खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात (Health Center) नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.

Latest Marathi News Live Update
अभ्यासासाठी गेलेल्या मुली घरी परतल्याच नाहीत! शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

LPG Price 1 April : एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी झाला स्वस्त

LPG Price 1 April : आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीत आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडर कोलकात्यात 32 रुपयांनी, मुंबईत 31.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Mumbai High Court : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी

मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी आज (ता. १) मुंबई उच्च न्यायालयात न्या. एस. एम. मोडक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आरोप झालेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्या दोष मुक्ततेला अंजली दमानिया यांनी आव्हान दिले असून सोमवारी सुनावणी होणार आहे.

Prakash Ambedkar : वंचितकडून लोकसभेसाठी 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा निषेध करण्याच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीच्या तमाम नेत्यांनी काल रामलीला मैदानावर एकजूट दाखविली. तर, दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात न्या. एस. एम. मोडक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. वंचितने लोकसभेसाठी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com