Supriya Sule Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत भावनिक पोस्ट केली आहे. ‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून अजित पवार आणि त्यांच्या बहिणींमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये लहानपणीच्या आणि कुटुंबातील एकत्रित क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला. दरवर्षी भाऊबीजेच्या दिवसाची सर्व बहिणींना आतुरता असायची. मात्र, यंदा भाऊबीजेचा दिवस उजाडताच अजित पवार यांच्या आठवणींनी मन भरून आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या बहिणींच्या घोळक्यात रमलेले अजितदादा, त्यांच्यासोबतच्या गप्पा आणि हास्याचे क्षण आजही डोळ्यांसमोर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूर्वी सहज वाटणारे हे क्षण आता किती मोलाचे होते, याची जाणीव होत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.