
पेठ–भावडी (ता.आंबेगाव) रस्त्यावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या सात हायवा वाहनांवर आंबेगाव–जुन्नर विभागाच्या प्रांत कार्यालयाने धडक कारवाई केली. वाहनांमधून एकूण ५६ ब्रास खडी व डबरची वाहतूक होत असल्याचे तपासणीत आढळले. सातही वाहने जप्त करून घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. प्रत्येक वाहनावर ३ लाख ६७ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण २५ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.