सलाम! जखमींना नेण्यासाठी मिळाले नाही स्ट्रेचर; पोलिसाने खांद्यावरून पोहोचवलं रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

मिनी ट्रकवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यानं झालेल्या या अपघातात 30 ते 35 कामगार जखमी झाले. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत.

जबलपुर - मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मंगळवारी भीषण अपघात झाला. मिनी ट्रकवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यानं झालेल्या या अपघातात 30 ते 35 कामगार जखमी झाले. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये एका पोलिसाने स्ट्रेचर नसल्यानं जखमी महिलेला खांद्यावरून रुग्णालयात पोहोचवलं. त्या पोलिसावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अपघातानंतर गाडीचा मालक मल्लू राय हा चालकासह फरार झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. अपघात झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभारसुद्धा चव्हाट्यावर आला आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. 

हे वाचा - गुजरातमध्ये दोन ट्रकच्या भीषण धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

जखमी कामगारांना खांद्यावरून घेऊन जात असताना पोलिस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लोक संबंधित अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत. या पोलिस अधिकाऱ्याच्या हाताला 2006 मध्ये एका चकमकीवेळी दुखापत झाली होती. संतोश सेन असं त्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे.

अपघातातील सर्व कामगार हे कोहला इथून शाहपुराला जात होते. यादरम्यान असलेल्या घुगरी इथं ट्रकला अपघात झाला. या अपघातात जवळपास 30 ते 35 जण जखमी झाले. यावेळी स्थानिक  लोक आणि चरगवा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यातील कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh asi run injured women on shoulder photo viral