'गोडसे स्टडी सर्कल'चा दोन दिवसांत गुंडाळला गाशा; बॅनरसकट साहित्य जप्त, प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

अवघ्या दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सुरु करण्यात आलेलं 'गोडसे स्टडी सर्कल' आता गुंडाळण्यात आलं आहे.

भोपाळ : अवघ्या दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सुरु करण्यात आलेलं 'गोडसे स्टडी सर्कल' आता गुंडाळण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे ही 'गोडसे ज्ञानशाळा' उघडण्यात आली होती. हिंदू महासभेने आपल्या कार्यालयातच हे स्टडी सर्कल उघडलं होतं. मात्र आता हे स्टडी सर्कल बंद करण्यात आलं आहे. ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने काल मंगळवारी हे स्टडी सर्कल कारवाई करुन बंद केलं. तसेच या स्टडी सर्कलमधील उपलब्ध साहित्य देखील जप्त केलं आहे. शहरातील तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम रहावी म्हणून जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींना कट करुन हिंदू महासभेच्या एका टोळीने मारलं होतं. त्या टोळीचा गोडसे हा सदस्य होता. या मारेकऱ्याच्या नावाने उघडलेल्या या स्टडी सर्कलमुळे संबंधित परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. 

या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरामध्ये 144 कलम लागू केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या स्टडी सर्कलचा गाशा गुंडाळण्यात आला. याबाबतची माहिती ग्वाल्हेरचे पोलिस अधिक्षक अमित संघी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, हिंदू महासभेच्या सदस्यांसमवेत बैठक झाल्यानंतर हे स्टडी सर्कल बंद करण्यात आले. यातील सर्व साहित्य, पोस्टर्स,  बॅनर्स आणि संबंधित गोष्टी आणि साहित्य जप्त केलं गेलं आहे. 

हेही वाचा - नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ प्रज्ञा ठाकूर पुन्हा मैदानात; म्हणाल्या, काँग्रेसने नेहमीच...
हे स्टडी सर्कल सुरु करताना हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गोडसेसह विनायक सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या फोटोंचे पूजन केले होते आणि त्यांना श्रद्धासुमन अर्पित केले होते. भूतकाळातील महापुरुषांबाबत नव्या पिढीला माहिती करुन देता यावी, यासाठी कार्यशाळा सुरु करण्यात आल्याचं हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. गेल्या रविवारी ही ज्ञानशाळा सुरू करताना नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला होता.

महात्मा गांधी यांच्या हत्त्येची तयारी ग्वालियरमध्ये करण्यात आली होती आणि हत्त्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल तत्कालीन सिंधिया राज्याच्या चिन्हाचे होते. दरम्यान, हिंदू महासभा दरवर्षी नथुराम गोडसेचा बलिदान दिवस आणि जन्मदिवस साजरा करते. काही वर्षापूर्वी हिंदू महासभेने आपल्या कार्यालयात गोडसेची प्रतिमा स्थापित केली होती. पण वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रतिमा जप्त केली. आता सभेने गोडसे स्टडी सर्कल सुरु केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता होतीच. त्यावर देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया देखील उमटल्या  होत्या. मात्र आता वेळीच खबरदारी घेत प्रशासनाने त्यावर कारवाई केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh Gwalior hindu mahasabha nathuram godse study circle shut two days after opening