esakal | माफियांना उमेदवारी नाही : मायावती
sakal

बोलून बातमी शोधा

 मायावती

माफियांना उमेदवारी नाही : मायावती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बसप बाहुबली किंवा माफिया उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार नाही, असे स्पष्टीकरण बसप प्रमुख व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दिले. त्याचप्रमाणे, माऊ मतदारसंघातून गुन्हेगारीकडून राजकारणाकडे वळलेल्या मुख्तार अन्सारीलाही पक्षाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असेही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले.

हेही वाचा: लसीकरणामध्ये प्रगत राष्ट्रांपेक्षाही पुढे आहेत भारतातील 'ही' राज्ये

मायावती म्हणाल्या, की उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत बाहुबली किंवा माफियांना उमेदवारी दिली जाणार नाही. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांनाही आवाहन केले आहे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या तत्त्वाचे अनुसरण करणारा पक्ष म्हणून बसपला ओळखले जावे.

त्याचप्रमाणे, माऊमधून मुख्तार अन्सारीला उमेदवारी दिली जाणार नाही. अन्सारीऐवजी भीम राजभार यांना उमेदवारी दिली जाईल. मुख्तार अन्सारीचा आणखी एक भाऊ अफजल अन्सारी उत्तर प्रदेशातील गाझीपूरचा बसपचा खासदार आहे. त्यांनी भाजप उमेदवार व जम्मू आणि काश्मीरचे सध्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा पराभव केला होता.

मुख्तारला एमआयएमच्या पायघड्या

मायावती यांनी ही घोषणा केल्यानंतर काही मिनिटांत असदुद्दीन ओवेसी यांच्या अखिल भारतीय मजलीस-ए-इत्तीहादूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाने अन्सारीला तिकीट देऊ केले. एमआयएमने १०० जागा लढविण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवक्ते सय्यद असीम वकार यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे दरवाजे अन्सारी यांच्यासाठी खुले आहेत.

केवळ मुख्तारच नव्हे तर इतर कोणत्याही मुस्लीम उमेदवाराने कोणत्याही पक्षाकडून तिकीट खरेदी करू नये. याचे कारण ते पक्ष पैसे घेतील आणि तुम्ही जिंकणार नाही हेच खात्रीने पाहतील. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या मुस्लिमांना मी एमआयएममध्ये येण्याचे आमंत्रण देतो. आम्ही तुम्हाला तिकीट देऊ.

loading image
go to top