Corona Updates: महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यांत कोरोनाचा सर्वाधिक प्रसार

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 19 October 2020

सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने शनिवारपासून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने शनिवारपासून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. दुसऱ्या बाजूला भारतातील मागील 6 आठवड्यांतील कोरोनाची परिस्थिती दिलासा देणारी आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली गेली असून ती दिवसेंदिवस कमी होत आहे.

देशात 22 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथं कोरोनाचे 20 हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. फक्त 3 राज्यांत सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1 लाख 85 हजार 750 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर कर्नाटक आणि केरळात अनुक्रमे 1 लाख 10 हजार 666 आणि 96 हजार 100 सक्रिय रुग्ण आहेत. तर नागालॅंडमध्ये सर्वात कमी म्हणजे 1530 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

वाचा सविस्तर: NEET 2020: यूपीतील आकांक्षाला पैकीच्या पैकी गुण तरीही देशात दुसरी; जाणून घ्या कारण

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 579 जणांचा मृत्यू झाला असून 55 हजार 722 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या 7 लाख 72 हजार 55 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत.

 

वाचा सविस्तर: न्यायालय ही मनमानीची जागा नाही : न्यायालय

आतापर्यंत देशात 75 लाख 50 हजार 273 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 66 लाख 63 हजार 608 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मागील 24 तासांत देशात 66 हजार 399 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच देशातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 14 हजार 610 झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

18 सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या 8 लाख 59 हजार 786 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 9 कोटी 50 लाख 83 हजार 976 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने ( Indian Council of Medical Research) दिली आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Karnataka and Kerala Corona spreads at highest