गोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात तीव्र बंडखोरी उफाळून आली असून पाच बंडखोर उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सात पैकी केवळ दोन जागा शिंदे गटाला आणि पाच जागांवर भाजपचे उमेदवार देण्यात आल्याने शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मयुरेश बदड (वॉर्ड ५०), गणेश शिंदे (वॉर्ड ५४), श्रेया गणेश शिंदे (वॉर्ड ५१), सुनीता बावदाणे (वॉर्ड ५४) आणि आशा कदम (वॉर्ड ५१) यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. वर्षभरापूर्वी पक्षात आलेल्या स्वप्निल टेंभवलकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने वाद अधिक चिघळला असून उमेदवारावर २० कोटी रुपयांच्या विकास निधी अपहाराचा गंभीर आरोप माजी विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी हायकोर्टात याचिका व तक्रारी प्रलंबित असल्याचा दावा करण्यात येत असून गणेश शिंदे यांनी उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. या बंडखोरीमुळे गोरेगाव विधानसभेतील निवडणूक लढत अधिक चुरशीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.