मोदी-शहांच्या सोयीनुसार वेळापत्रक ठरवलंय का? निवडणुक आयोगावर ममता कडाडल्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

ममता बॅनर्जी यांनी करडे बोल सुनावत विचारलंय की, हे वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरुन तयार केलं गेलंय की अमित शहांच्या?

कोलकाता : ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका 8 टप्प्यांमध्ये घेण्यात येतील, असं निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी साडेचार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. मात्र, मतदानाच्या आठ टप्प्यांवरुन ममता बॅनर्जी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा - Breaking:तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसामच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

ममता बॅनर्जी यांनी करडे बोल सुनावत विचारलंय की, हे वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरुन तयार केलं गेलंय की अमित शहांच्या? त्यांच्या प्रचाराला सोयीस्कर ठरेल यासाठीच या तारखा बनवण्यात आल्या आहेत का? जेणेकरुन ते आसाम आणि तमिळनाडूच्या निवडणुका संपवून बंगालकडे आपला मोर्चा वळवू शकतील? हे भाजपला फायद्याचं ठरणार नाहीये. आम्ही त्यांना नेस्तनाबूत करु, असं ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यामधील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशासाठी काम करायला हवं. ते निवडणुकांसाठी आपल्या सत्तेचा वापर करु शकत नाहीत. आम्ही पंतप्रधानांचं स्वागत करतो मात्र ते सत्तेचा दुरुपयोग करु शकत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - 'त्यापेक्षा असं करा'; मोदी स्टेडीयमच्या नाव बदलाबाबत सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला अजब सल्ला

केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. तमिळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांबरोबरच पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 तर, आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तमिळनाडू, पुद्दूचेरी आणि केरळ या दक्षिणेतील निवडणुकांसाठी एका दिवशी 6 एप्रिलला मतदान आहे. 2 मे रोजी या निवडणुकांचा एकत्रित निकाल लागणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा

  •     एकूण जागा - 292
  •     तृणमूल काँग्रेस - 209
  •     काँग्रेस - 23
  •     माकप - 19
  •     भाजप - 27
  •     इतर - 6
  •     रिक्त जागा - 10

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee questions election commission about West Bengal polls in 8 phases