'तुम्हाला हे शोभत नाही'; PM मोदींच्या व्यासपीठावर जय श्रीराम ऐकताच ममतादीदी भडकल्या

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राग बघायला मिळाला.

कोलकाता - नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राग बघायला मिळाला. व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये त्यांना भाषण करण्यास नकार दिला. 

ममता बॅनर्जी जेव्हा व्यासपीठावर भाषणासाठी गेल्या तेव्हा घोषणाबाजी सुरु झाली. तेव्हा ममता बॅनर्जींनी म्हटलं की, कोणाचा अपमान करणं ठीक नाही असं म्हणत त्यांनी न बोलण्याची भूमिका घेतली. ममता बॅनर्जी मंचावर येताच लोकांनी जय श्रीराम अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 

व्हिक्टोरिया मेमोरियलच्या कार्यक्रमावेळी एका बाजुला जय श्रीराम तर दुसऱ्या बाजुला भारत माता की जय अशा घोषणा सुरु झाल्या. त्यावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या. तेव्हा ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर तुम्ही कोणाला बोलावलं आहे आणि आमंत्रण दिलं आहे तर अशा प्रकारे कोणाचा अपमान करता येणार नाही. 

हे वाचा - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची लाखमोलाची गोष्ट; एक लाखाच्या नोटेवर होता फोटो

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मला वाटतं की सरकारच्या कार्यक्रमात काहीतरी मर्यादा असायला हव्यात. हा सरकारी कार्यक्रम आहे. कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही. सर्वपक्षीय आणि सार्वजनिक कार्यक्रम आहे. मी पंतप्रधानांचे आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानते की तुम्ही कोलकात्यात कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र एखाद्याला आमंत्रण देऊन त्याचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. मी याचा निषेध व्यक्त करते आणि इथं बोलणार नाही. जय हिंद , जय बांगला.' असं म्हटल्यानंतर ममता बॅनर्जी भाषण थांबवून थेट खुर्चीवर जाऊन बसल्या. 

हे वाचा - WHO ने पुन्हा केलं भारताचं कौतुक; मानले पंतप्रधान मोदींचे आभार

दरम्यान, कार्यक्रमाच्या आधी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली नसल्यानं त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करतो. तुम्ही नवीन संसद निर्माण करत आहात, विमाने खरेदी करताय पण नेताजींच्या स्मारकाचे काय? ते का नाही? कोलकात्यात सहा किलोमीटर पदयात्रेनंतर ममता बॅनर्जींनी हे प्रश्न सरकारला विचारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamta banarjee disappoint over slogan during netaji s birth anniversary event