WHO ने पुन्हा केलं भारताचं कौतुक; मानले पंतप्रधान मोदींचे आभार

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. टेड्रोस यांनी म्हटलं की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सतत साथ दिल्याबद्दल भारताचे आभार. गेल्या काही दिवसांमध्ये आशियाई देशांसह ब्राझील, मोराक्को या देशांनादेखील भारताने व्हॅक्सिन पाठवली आहे.

ट्रेडोस यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं की, ग्लोबल कोविड 19 रिस्पॉन्सला भारताने सातत्यानं सहकार्य केल्याबद्दल भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार. आपण मिळून काम केलं, एकमेकांना ज्ञानाची देवाण घेवाण केली तर कोरोनापासून लोकांना वाचवू शकतो.

जगातील इतरही काही देशांनी भारताचे आभार मानले आहेत आणि त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा भारताच्या कामाचे कौतुक केलं आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी भारताच्या व्हॅक्सिनला संजीवनी बूटी म्हणत भारताचे आभार मानले आहेत. त्यासोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.

हे वाचा - ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं, जय हनुमान ! धन्यवाद भारत

नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीवला भारताने व्हॅक्सिनचे लाखो डोस पाठवले आहेत. याशिवाय मॉरिशिअस, म्यानमार आणि सेशेल्सला व्हॅक्सिन पाठवण्यात येणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तानलासुद्धा लस पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही मोदींचे आभार मानले होते. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या कोरोना लसीचे 20 लाख डोस बांगलादेशला पाठवण्यात आले आहेत. शेख हसीनवा यांनी गुरुवारी म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट म्हणून व्हॅक्सिन पाठवले त्याबद्दल आभारी आहे. मला आशा आहे की, बांगलादेश कोरोनापासून मुक्त होईल. जगातील 92 देशांनी कोरोनाच्या लशीसाठी भारतासोबत संपर्क साधला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who chief say thanks to india and pm modi for covid 19 response