ममतांना आयोगाने ठणकावले; आरोपांमुळे निवडणूक उपायुक्तांचे खरमरीत पत्र

Election-Commission-of-India
Election-Commission-of-India

नवी दिल्ली / कोलकता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या बेछूट आरोपांवर निवडणूक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता यांची उक्ती ही वक्रोक्ती असून हा या संस्थेचे महत्त्व कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी बांकुरा येथील प्रचारसभेत ममता यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आयोगात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर जैन यांनी क्वचित लिहिले जाणारे अत्यंत खरमरीत पत्र धाडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कोलकता आणि दिल्लीतील बैठकांची पर्वा केलेली नाही. आयोगाने राजकीय पक्षांची भेट घ्यावी असे विधान त्यांनी केले असेल तर तो या संस्थेला कमी लेखण्याचाच प्रयत्न आहे. कोणताही राजकीय गट किंवा तत्सम घटकांबरोबरील कथित जवळीकीवरून कोंडी केली जाण्याने आयोगाला फरक पडणार नाही. मुख्यमंत्री मात्र तसे चित्र निर्माण करण्यावर ठाम दिसतात. हा समज पक्का व्हावा म्हणून त्यांचे प्रयत्न कायम असतील तर त्याची कारणे त्यांनाच ठाऊक असतील. हे निव्वळ दुर्दैवी असून त्या असे का करतात याचा खुलासा त्याच करायला हवा.

बांकुरात ममता यांनी भाषणात प्रश्नांची सरबत्तीच केली. कोण चालवत आहे निवडणूक आयोग ? अमित शहा, तुम्ही तो चालवीत आहात का ? आम्हाला मुक्त आणि न्याय्य निवडणूका हव्या आहेत, पण अमित शहा कोण आहे ? निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक कोण आहे ? असे सवाल उपस्थित करून त्यांनी केंद्रीय गृह मंत्र्यांवर थेट आरोप केले. आपल्याला जीवे मारण्याचा कट आखण्यात आला असून नंदीग्राममधील हल्ला हा त्याचा एक भाग होता असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या सभेच्या प्रसार माध्यमांवरील बातम्या वाचल्याचे जैन यांनी सूचित केले, मात्र सभेतील भाषणाचा अधिकृत मजकूर मिळाला नसल्यामुळे केवळ ममता यांच्या पत्राला उत्तर दिल्याचेही त्यांनी नमूद केले. ममता यांनी १४ मार्च रोजी आयोगाला पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते.

पोलिस प्रमुखांना हटविण्याचा संदर्भ
बंगालचे पोलिस महासंचालक वीरेंद्र यांना गेल्या आठवड्यात हटविण्यात आले. तेव्हापासून आयोगाबद्दल तृणमूलने आपले आक्षेप दडवून ठेवले नसून ते जाहीरपणे मांडले आहेत. नंदीग्रागममध्ये ममता सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे जखमी झाल्याचा निर्वाळा देताना आयोगाने हल्ल्याचे पुरावे मिळाले नसल्याचे सांगत ती शक्यता फेटाळून लावली. ममता यांच्या वाहनाभोवती गर्दी जमा झाल्यानंतर चालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी कृती केली नसल्याचा ठपकाही आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे ममता आणखी डिवचल्या गेल्या आहेत. ममता प्रत्येक सभेत व्हिलचेअरवर बसून भाषण देत आहेत. मी वेदनांसमोर हार मानली तर भाजप जनतेला वेदना देईल, असे त्या 
आक्रमकपणे सांगतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com