esakal | सर...माझा GMail चा पासवर्ड विसरला! आता मी काय करू? थेट गुगलच्या सीईओंना मागितली मदत

बोलून बातमी शोधा

Sundar Pichai

सर...माझा GMail चा पासवर्ड विसरला! आता मी काय करू? थेट गुगलच्या सीईओंना मागितली मदत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अनेकजण Gmail, फेसबुक, इंस्टा किंवा इतर कोणतेही अकाउंट असतील त्याचे पासवर्ड विसरतात. त्यामुळे त्या संबंधित अकाउंट उघडताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करताना तिथे फॉरगॉट पासवर्ड नावाचे पॉपअप येते. त्यावर क्लिक केले, तर आपण आपला पासवर्ड रिसेट करू शकतो. मात्र, पासवर्ड विसरला म्हणून डायकरेक्ट कंपनीच्या सीईओकडे मदत मागितल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? तर हो...Gmail account चा पासवर्ड विसरल्याने एक व्यक्तीने थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मदत मागितली आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

सुंदर पिचाई यांनी २६ एप्रिल रोजी ट्विटरद्वारे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतासाठी UNICEF आणि Give India यांना135 कोटी रुपयांची मदत गुगलद्वारे करत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या ट्विटवर @Madhan67966174 या भारतीय युजरने Gmail account चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी ट्विटरद्वारे मदत मागितली. हॅलो सर, तुम्ही कसे आहात? सर, मी Gmail चा पासवर्ड विसरलो असून तो रिकव्हर करण्यासाठी कृपया मला मदत करा, असे ट्विट करत त्याने सुंदर पिचाई यांना ट्विटमध्ये टॅग केले. थेट गुगलच्या सीईओला केलेली मागणी पाहून नेटकऱ्यांनी त्या तरुणाची मात्र चांगलीच खिल्ली उडविली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की खरंच सुंदर पिचाई यांनी त्याच्या ट्विटला रिप्लाय दिला का? तर नाही, पिचाई यांनी त्यांच्या ट्विटला कुठलेही उत्तर दिले नाही. मात्र, नेटकऱ्यांनी त्या तरुणाची चांगलीच खिल्ली उडविली. सध्या सुंदर पिचाई अमेरिकेत आहेत. ज्यावेळी प्रवासावरील निर्बंध हटवले जातील. त्यावेळी ते तुमच्या घरीत येतील व पासवर्ड रिकव्हर करण्यास मदत करतील, असं उत्तर दिलं. एकाने तर सुंदर पिचाई पासवर्ड ठेवा म्हणजे तुम्ही कधी विसरणार नाही, असाही सल्ला दिला.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत