सनी देओलच्या 'गदर'ची आठवण; दिल्ली हिंसाचारात तरुणाने वाचवला गर्भवतीचा जीव!

Gadar-Delhi-Violence
Gadar-Delhi-Violence

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेली दिल्ली नुकतीच हिंसाचाराच्या तडाख्यातून सावरत आहे. फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिल्लीत अभूतपूर्व हिंसाचार झाला. शाहीन बाग येथे सुरू असेलेलं सीएए आणि एनआरसीविरोधातील आंदोलन चिघळल्यानं हा हिंसाचार झाला. या हिंसाचारात ४५ दिल्लीकरांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक सार्वजनिक ठिकाणं आणि दुकानांची वित्तहानीही झाली.  

एकीकडे दिल्ली जळत असताना दुसरीकडे मानवतेची अनेक रुपं दिसून आली. धार्मिक सद्भावना असो किंवा अजून कोणती गोष्ट. एका चित्रपटाच्या कथानकही यापुढे फिकं पडेल अशीच काहीशी ही कथा आहे. ईशान्य दिल्लीत दगडफेक, जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या. दिल्लीतील करवाल नगरमध्येही परिस्थिती अशीच काहीशी होती. 

२२ ते २४ फेब्रुवारीला दिल्ली धगधगत होती. दरम्यान, २४ फेब्रुवारीला करवाल नगरमधील एका गर्भवती महिलेला प्रसुती वेदना होऊ लागल्या. मात्र, बाहेर दंगल उसळल्याचे दिसत असल्याने त्या गर्भवती महिलेला कोणताच पर्याय दिसत नव्हता. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात आल्यावर तो तरुण गर्भवतीला घेऊन हॉस्पिटलकडे निघाला. चौकात उभ्या असलेल्या जमावाने त्यांना अडवले. त्यावेळी माझ्या बायकोला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे त्या तरुणाने सांगितले. जमावाला कसंतरी तोंड देत त्यानं ओळखीच्या एका डॉक्टरला गाठलं. त्यानंतर त्या डॉक्टरनं त्या गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यास सांगितले. 

बाहेर जाळपोळ सुरू असताना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. गर्भवती महिलेचे कुटुंबीय मुस्तफाबादमध्ये राहत असल्याचे समजल्यानंतर तिला घेऊन तो तरुण निघाला. हिंसाचार करणाऱ्या टोळक्यांच्या तावडीतून वाट काढत तो महालक्ष्मी नगरमार्गे मुस्तफाबादकडे निघाला. मुस्तफाबादमध्ये पोहोचताच तिथेही त्यांना एका जमावाने अडवले. तेव्हा त्यांनी सगळी हकिकत सांगितली. 

करवाल नगर परिसरातील टोळक्याला चकवा देत त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केल्याचे पाहून त्या जवामाने दोघांना जाण्यास सांगितले. गर्भवती महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या हवाली केल्यानंतर त्याने सदर घटना तिच्या कुटुंबीयांनाही सांगितली. तेव्हा कुटुंबीयांनी त्या तरुणाचे आभार मानले. आणि तो तरुण पुन्हा आपल्या करवाल नगरमधील घरी परतला.

दिल्ली हिंसाचारानंतरच्या अशा अनेक घटना हळूहळू माध्यमांसमोर येत आहेत. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तसंस्थेने सदर वृत्त दिले आहे. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हिंदी चित्रपट 'गदर'ची यामुळे आठवण आल्याचे नेटकरी म्हणत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com