Manipur News : मणिपूरमध्ये ६४ मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द

मणिपूरमध्ये या वर्षी मे महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या ६४ जणांचे शवागारातील मृतदेह कडेकोट सुरक्षेत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले.
Manipur
ManipurSakal

इंफाळ - मणिपूरमध्ये या वर्षी मे महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या ६४ जणांचे शवागारातील मृतदेह कडेकोट सुरक्षेत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. यापैकी ६० मृतदेह कुकी समुदायातील तर चार मैतेई समुदायातील आहेत.

येथील ‘जेएनआयएमएस’ आणि ‘आरआयएमएस’ रुग्णालयांत ठेवलेले कुकी समुदायातील नागरिकांचे मृतदेह मणिपूर पोलिस व आसाम रायफल्सच्या तुकडीच्या कडेकोट सुरक्षेत हवाई मार्गाने आणून, त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

त्याचप्रमाणे, मणिपूरमधील चुरचांदपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील शवागारात ठेवलेले मैतेई समुदायातील चौघांचे मृतदेहही इंफाळला आणून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील तपास, नुकसानभरपाई, पुनर्वसन आदींसाठी सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती.

या समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने या राज्यातील वांशिक हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामध्ये ओळख पटलेल्या मात्र नातेवाइकांनी हक्क न सांगितलेल्या ८८ जणांच्या मृतदेहांचाही समावेश आहे. संबंधितांचे नातेवाईक हे मृतदेह स्वीकारून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू शकतात किंवा राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

कोणीही हक्क न सांगितलेल्या मृतदेहांचे शवागारात दीर्घकाळ जतन करण्यामुळे राज्य सरकारचा खर्च वाढत असून मृतांबद्दलही अनादर दिसत असल्याची टिप्पणी समितीने अहवालात केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्काराची परवानगी राज्य सरकारला दिली होती.

हिंसाचाराचे बळी

  • १७५ - एकूण मृत्यू

  • १६९ - ओळख पटलेले

  • ८१ - कुटुंबीयांनी हक्क सांगितलेले

  • ९४ - कुणीही हक्क न सांगितलेले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com