‘मन की बात’ला लोकांची मिळेना साथ; गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ

modi
modi

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.३०) आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून मांडलेले विचार अनेक लोकांना अजिबात आवडलेले नसल्याचे ‘यू ट्यूब’च्या आकडेवारीतून समोर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा मन की बातचा 68 वा रेडिओ कार्यक्रम न आवडलेल्यांची संख्या तब्बल अडीच पटींनी जास्त आहे. गेल्या सहा वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे. 

नकारात्मक प्रतिक्रिया 
‘मन की बात’ कार्यक्रम कालच्या दिवसांत सर्व माध्यमांवर मिळून एक कोटी ३१ लाख १२ हजार ६०२ जणांनी ऐकल्याची नोंद झाली आहे. मोदी यांच्या या मासिक रेडिओ संवादाची देशभरातील लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमांत गणना होते. मात्र कालचा भाग न आवडलेल्या लोकांची संख्या तो आवडल्याचे सांगणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे दिसले आहे. ‘मन की बात’चा काल ६८ वा भाग प्रसारित झाला. या भागाला मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रिया संघपरिवार व भाजपच्या सोशल मीडिया केंद्राला आणि संबंधितांना खडबडून जागे करणाऱ्या ठरल्या आहेत. 

लांबलेले खेळणे पुराण 
पंतप्रधान मोदी हे २०१४ च्या गांधी जयंतीपासून ‘मन की बात’च्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नियमितपणे देशवासीयांशी संवाद साधत आहेत. हा कार्यक्रम त्यांनी थेट राजकीय विषयांपासून कटाक्षाने दूर ठेवला असून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक तसेच यशोगाथा सांगणाऱ्या विषयांचीच मुख्यत्वे निवड करतात. कालच्या भागात त्यांनी देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्याबाबत विवेचन केले होते. जगात सात लाख कोटी रुपयांच्या खेळण्यांच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा अगदीच नगण्य आहे तो वाढवायला हवा व स्वदेशी खेळणीच जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असे त्यांनी आवाहन केले होते. भारतात चांगलेच बाळसे धरलेल्या चिनी खेळण्यांच्या बाजारपेठेलाही धक्का देण्याचे सूतोवाच या माध्यमातून केले. मात्र मोदी यांचे हे खेळणे पुराण जास्तच लांबल्याने लोकांना ते न आवडल्याचे यावरील प्रतिक्रियांतून दिसून येते. 

नासपंती अधिक 
‘यू ट्यूब’वरील नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटद्वारे हा भाग पाहिलेल्यांपैकी ३५ हजार लोकांनी तो आवडल्याचे (लाइक) नोंदवले तर त्यापेक्षा जवळपास अडीचपट म्हणजे ९० हजारांहून जास्त लोकांनी त्याबद्दल नापसंती (डिसलाइक) व्यक्त केली. कालच्या ‘मन की बात’वर ६ लाख ६८ हजार ८५२ लोकांनी भेट दिली आहे. 

भाजपची आकडेवारी चक्रावणारी 
भाजपच्या यू ट्यूब चॅनेलवरील या ‘मन की बात’ला मिळालेला कौल पाहिला तर ‘लाइक’ व ‘डिसलाइक’ यांच्यातील फरक आणखी चक्रावणारा आहे. भाजपच्या या चॅनलद्वारे हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांपैकी ५२ हजार लोकांनी कालचा विषय आवडल्याचे (लाइक) नोंदवले तर तो न आवडल्याचे सांगण्याचे स्पष्टपणे हिंमत करणारे तब्बल तीन लाख ९२ हजार दर्शक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com