गुजरातमध्ये मराठी कोरोनाबाधिताचा मारहाणीत मृत्यू; व्हायरल व्हिडिओनंतर नातेवाईकांचा आरोप

prabhakar patil
prabhakar patil

राजकोट - गुजरातमध्ये स्थायिक असणाऱ्या मराठी कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. त्यात रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक नसून हा खूनच आहे आणि हॉस्पिटल स्टाफला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी राजकोटमधील मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्पिटल कर्मचारी रुग्णाच्या छातीवर गुडघा ठेऊन त्याला मारहाण करत असल्याची दृश्ये दिसत आहेत. दरम्यान मृत रुग्ण हा किडनीच्या विकाराने ग्रस्त होता तसेच मानसिक रोगीही होता. त्याला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. तो कपडे फाडून फेकत होता, मारहाण करत होता आणि इतर रुग्णांना त्रास होईल असे वर्तन करत होता. रुग्ण पळून जाण्याचाही प्रयत्न करत होता, असा खुलासा व्हायरल व्हिडीओवरुन निर्माण झालेल्या प्रक्षोभानंतर हॉस्पिटलने केला आहे.

या प्रकरणी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे मानसिक रोगी असल्याने त्यांना शांत करण्यासाठी हॉस्पिटलच्या मानसशास्त्र विभागातील डॉक्टरांना बोलवण्यात आले. तसंच रुग्णाला कुणीही मारहाण केली नसून व्हायरल झालेला व्हिडीओ हा सत्यतेची पडताळणी न करताच पसरवला गेला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी नितिन गोयल आणि राजू गोस्वामी या दोन अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हरना ताब्यात घेतले आहे. 


याबाबत मिळालेली माहिती अशी की, रुग्ण प्रभाकर पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कुटुंबासमवेत राजकोटमध्ये राहत होते. ते किडनीच्या विकारावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. किडनीत पाणी झाल्याने त्यांचे 7 सप्टेंबर रोजी ऑपरेशन करण्यात करण्यात आले होते. दरम्यान दुसऱ्याच दिवशी त्यांना कोविडची सौम्य लक्षणे असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्यावर राजकोटमधील पंडीत दिनदयाल उपाध्याय सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 8 तारखेनंतर थेट 12 तारखेलाच रुग्ण दगावल्याची माहिती नातेवाईकांना कळवण्यात आली होती. 


सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णाशी फोनवरुन बोलणं व्हायचं. मात्र डॉक्टर राऊंडवर असल्याचे कारण देऊन रुग्णाला भेटूच दिले नाही, असाही नातेवाईकांचा आरोप आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला किडनी विकाराव्यतिरीक्त इतर कोणतेही मानसिक आजार नव्हते. सिव्हील हॉस्पिटलने आपल्या बचावासाठी रुग्णाला डायबेटीज, ब्लड  प्रेशर आणि हायपर टेन्शनचा आजार होता, असा केलेला दावा खोटा असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मृताचा चेहरा दुरुनच दाखवण्यात आला. त्याच्या चेहऱ्यावर संशयास्पद डागही होते. त्याच रात्री गडबडीत रुग्णावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. 
नातेवाईकांना रुग्णाला झालेल्या मारहाणी संदर्भात कसलीच कल्पना नव्हती. मात्र रुग्णाला मारहाण करतानाचा व्हिडीओ 17 सप्टेंबरला व्हायरल झाला आणि त्यांना धक्काच बसला. हा व्हिडीओ 8 तारखेच्या रात्री 2 वाजताचा असल्याचे म्हटले जात आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये रूग्ण बरा होता मात्र त्याला कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर अचानक काय झालं? रुग्ण मानसिक रोगी कसा झाला? असा प्रश्न संतप्त नातेवाईक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 


जवळपास एक मिनिटाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीवर गुडघा ठेवला आहे. त्याच्या गालावर मारहाण केली जात आहे. बाजूलाच एक कर्मचारी हातात काठी घेऊन उभा आहे. रुग्ण कळवळीने याचना करतो आहे. तरीही त्याला क्रूरपणे मारहाण केली जात आहे. इतर काही कर्मचारी हे सारे पाहत शांत बसले आहे. किडनीचे ऑपरेशन झालेले असतानाही रुग्णाच्या अंगावर याप्रकारे बसून मारहाण करतानाची धक्कादायक दृश्ये व्हिडीओत स्पष्टपणे दिसतात. ज्या स्थानिक पत्रकाराने या घटनेला सर्वात आधी वाचा फोडली त्या पत्रकाराला आणि ज्याने हा व्हिडीओ व्हायरल केला त्या व्यक्तीलाही काही काळ दवाखान्यात थांबवून ठेवण्यात आले होते, अशी माहिती देखील समोर आली आहे. 


पंडीत दिनदयाल उपाध्याय हॉस्पिटलच्या स्टाफला खून्याच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात यावी, अशी मागणी राजकोटमधील समस्त मराठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी परिमल पांड्या यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही या घटनेबाबत निषेध करुन तपासाची मागणी केली आहे. मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीत म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला धमकावणे, मानसिक त्रास देणे, मारहाण करणे अशा गोष्टी केलेल्या आहेत. रुग्णांच्या छातीवर  बसून केलेली मारहाण हे स्पष्टच करते की, कर्मचाऱ्याकडून रुग्णाचा खून केला गेला आहे. या प्रकरणावर हॉस्पिटलकडून आलेले स्पष्टीकरण मराठा समाजाकडून नाकारण्यात आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रुग्ण मानसिक रोगी होता, असे सांगितले जात आहे. या  प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना तसेच गुजरात उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधिशांना आणि राजकोट शहर पोलिस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com