बेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस प्रकरणावर आपली वेगळी प्रतिक्रिया मांडली आहे.

आपल्या वेगळ्या आणि काहीशा वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस प्रकरणावर आपली वेगळी प्रतिक्रिया मांडली आहे. या प्रकरणाचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. मात्र, बलात्कार का घडतात यासंबंधीच्या एका वेगळ्या मुद्यांवर त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरील या दिर्घ आणि सविस्तर पोस्टमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 

एक सविस्तर पोस्ट लिहून काटजू यांनी म्हटलंय की, मी हाथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराचा निषेध करतो. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. मात्र, अशा प्रकरणांच्या मागे असणारा आणखी एक दुर्लक्षित पैलू आपण ध्यानात घेतला पाहिजे. सेक्स ही पुरुषाची नैसर्गिक गरज आहे. असं म्हटलं जातं की अन्नानंतर जर कशाची गरज असेल तर ती सेक्सची आहे.

भारतासारख्या पुराणमतवादी देशात लग्न हाच एक मार्ग सेक्ससाठी उपलब्ध आहे. पण एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारीमुळे युवकांची लग्नेच होत नाहीत. कारण कोणतीही मुलगी सामान्यत: बेरोजगार युवकाशी लग्न करत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या संख्येने तरुण मुले ही सेक्सपासून वंचित राहतात. त्यांची लैंगिक भूक ज्या काळात नैसर्गिकरित्या वाढलेली असते, त्या काळातही ते या सगळ्या गोष्टींमुळे दूर राहतात. 

हेही वाचा - हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

1947 आधी फाळणीपूर्व काळात भारताची लोकसंख्या 42 कोटी होती. आज एकट्या भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या आसपास आहे. याचा अर्थ असाय की लोकसंख्येत चौपट वाढ झाली आहे. पण रोजगारामध्ये मात्र या तुलनेत अत्यंत कमी वाढ झालेली आहे. इतकचं नव्हे तर जून 2020 मध्ये एकट्या भारतात 12 कोटी लोकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यामुळे, बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली नसेल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

ते पुढे म्हणतात की, म्हणूनच, जर आपल्याला खरंच बलात्कारांची संख्या कमी करायची असेल तर आपल्याला भारतात अशी सामाजिक-आर्थिक व्यवस्था आणायला हवी जिथे बेरोजगारी नसेलच अथवा अत्यंत कमी असेल. अशी व्यवस्था असणं हे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालू शकतं असं काटजूंना वाटतं. 

हेही वाचा - धक्कादायक! हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

त्यांनी या पोस्टमध्ये ही गोष्ट पुन्हा पुन्हा स्पष्ट केलीय की, ते बलात्काराचे समर्थन करत नाहीत आणि ते त्याचा निषेधच करतात. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, काटजू यांच्या मताशी अनेकजणांनी असहमती दर्शवली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, ज्या पुरुषांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांना रोजगार आहे, ते बलात्कार करत नाहीत का? असा प्रश्न ते उपस्थित करताना दिसत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markandey Katju Statement On Hathras Gangrape Unemployment is reason behind rape