esakal | उत्तर प्रदेश : विधानसभेसाठी मायावतींची जुनीच रणनीती; ब्राह्मण मतांवर 'लक्ष्य'
sakal

बोलून बातमी शोधा

Mayawati

विधानसभेसाठी मायावतींची जुनीच रणनीती; ब्राह्मण मतांवर 'लक्ष्य'

sakal_logo
By
अमित उजागरे

लखनऊ : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक सन २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी आत्तापासूनच सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यामध्ये विविध समाजांची मतं महत्वाची ठरणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी यासाठी नवी योजना आखली आहे. त्यांच्यासाठी ब्राह्मण, मुस्लिम आणि दलितांच्या मतांचा वाटा महत्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा: डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींवर 15 सप्टेंबरला आरोप निश्चिती

उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या पाहता यासाठी सर्वाधिक जोर सध्या बसपानं लावला आहे. कारण राज्यातील १३ टक्के ब्राह्मणांची मतं ही सर्वच भागात निर्णायक भूमिका बजावू शकतात. यामागील निवडणुकीत याच ब्राह्मण मतांनी बसपाला सत्तेत विराजमान केलं होतं. २००७ च्या निवडणुकीत बसपाला बहुमत देण्याचं संपूर्ण श्रेय याच ब्राह्मण मतांना जातं. जी मतं यावेळीही मायावती आपल्या पारड्यात घेऊ इच्छित आहेत. त्यामुळेच बसपाच्या सर्व प्रबुद्ध संमेलनांमध्ये पक्षाचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी म्हटलंय की, "ब्राह्मण त्यांच्या पक्षासाठी पूजनीय आहेत आणि हाच समाज सर्वांना सोबत घेऊन चालू शकतो" त्यामुळेच त्यांनी घोषणा दिल्या होत्या की, "ब्राह्मण शंख बजाएगा, हाथी बढता जाएगा"

तेरा टक्के ब्राह्मणांनी साथ दिली तर चित्र पालटणार

बसपा प्रमुख मायावती यांना वाटतंय की "ब्राह्मण शंख बजाएगा, हाथी चलता जाएगा" ही घोषणा पुन्हा एकदा घुमावी. २००७ च्या निवडणुकीत ब्राह्मण संमेलनानं निवडणूक मोहिमेची सुरुवात केली होती. तेव्हा बसपानं ३० टक्के मतं मिळवत ४०३ पैकी २०६ जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. यावेळी देखील याच ३० टक्के मतं महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळेचं मायावती यांनी आपल्या रणनीतीमध्ये हे देखील म्हटलं की, "बसपाचे कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा निवडणुकीत १००० ब्राह्मण कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून घेतील. तसेच त्यांना निवडणूक कामात सोबत घेऊन काम करतील." उत्तर प्रदेशात जातीय समीकरण पाहिल्यास मुस्लिम आणि दलित मतांनंतर सर्वाधिक संख्या ब्राह्मण जातीच्या मतदारांची आहे. या राज्यात २० टक्क्यांच्या जवळपास दलितांची संख्या असून ब्राह्मण मतांची संख्या १४ टक्के आहे.

मुस्लिम मतांची भरपाई ब्राह्मण मतांनी

बसपासाठी दलित-मुस्लिम ही जुनी आघाडी आहे. आजपर्यंत मुस्लिमांचं मत हे समाजवादी पार्टीकडे झुकलेलं दिसून आलं आहे. या मुस्लिम मतांची भरपाई ब्राह्मण मतांनी करण्याची बसपाची योजना आहे. यामुळे निवडणुकीत फायदा होऊ शकतो. याशिवाय जर जागांची संख्या कमी झाली तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची स्थिती अधिक मजबूत होईल.

२०१२ पासून कमकुवत होतोय बसपा

मायावती यांचा पक्ष बसपा गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. २०१२ मध्ये अखिलेश यादव यांनी त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली होती. यानंतर बसपा सातत्यानं कमकुवत होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात बसपा जास्त जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. २०१४ मध्ये तर मोदी लाटेत सर्वच जण वाहून गेले होते. पश्चिम युपीत एकही जागा बसपाला मिळू शकली नव्हती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही बसपाला पश्चिम युपीत फटका बसला होता.

ब्राह्मण मतंच सर्वांसाठी किंग मेकर ठरतात

असं म्हटलं जातं की, ब्राह्मणांनी ज्या पक्षाला साथ दिली तो पक्ष सत्तेत येतो. ब्राह्मणांनी सुरुवातीला काँग्रेसला साथ दिली त्यामुळं ते सत्तेत होते. त्यानंतर २००७ मध्ये ब्राह्मणांनी बसपाला पाठिंबा दिला तर मायावतींचं सरकार आलं. त्यानंतर २०१२ मध्ये ब्राह्मण मतं समाजवादी पार्टीकडे वळली त्यामुळे अखिलेश यादव सत्तेत आले. त्यानंतर २०१४ पासून ब्राह्मण मतांचा भाजपकडे कल राहिला आहे त्यामुळे ते सत्तेत आहेत.

loading image
go to top