
रेल्वे स्थानकात महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला मारहाण
अमरावती : आंध्र प्रदेशातील गुंटूर (Guntur Andhra Pradesh) जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर महिलेवर सामूहिक बलात्कार (Crime Against Woman) झाल्याची घटना समोर आली आहे. रेपल्ले रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला तिचा पती आणि तीन मुलांसह दोन दिवसांपूर्वी प्रकाशम जिल्ह्यातील वेंकटद्रीपुरम गावातून गवंडी काम शोधण्यासाठी गुंटूर जिल्ह्यात आली होती. ते गुंटूर-रेपल्ले पॅसेंजर ट्रेनने शनिवारी रात्री उशिरा रेपल्ले रेल्वे स्थानकावर उतरले होते. त्यांनी प्लॅटफॉर्मवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब झोपलेले असताना तीन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पतीला उठवले, बाजूला ओढले आणि मारहाण केली. गोंधळ ऐकून महिलेला जाग आली आणि तिने हस्तक्षेप केला. दोन हल्लेखोरांनी महिलेला पकडून प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या बाजूला असलेल्या झुडपांच्या ढिगाऱ्याच्या मागे ओढले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पतीने रेपल्ले पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.
दोन्ही आरोपींनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिला रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या तिची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी रेपल्ले रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी शोध पथके तयार करण्यात आली आहेत. रेपल्लेबाहेरील सर्व मार्गांवर चौक्या उभारण्यात आल्या असून वाहनांची तपासणी केली जात आहे, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.