
Eknath Shinde responds to Uddhav Thackeray’s criticism : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज एक मोठा दिवस होता. कारण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जण दोन दशकानंतर एका मंचावर आणि एका मुद्य्यासाठी एकत्र आले होते. निमित्त होते मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित मराठी विजयी मेळावा.
यावेळी या दोन्ही नेत्यांची जोरदार भाषणं झाली, ज्यातून मराठी अस्मितेचा मुद्दा तर उचलण्यात आलाच मात्र सत्ताधारी भाजप व महायुती सरकारवर घणाघात करण्यात आला. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेनुसार पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडले. या मेळाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली, तसेच उद्धव ठाकरेंवरही पलटवार केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातील फरक काय होता, हे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’एकाच्या भाषणातून मराठी माणसाबद्दलची तळमळ दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणात सत्ता अन् खुर्चीसाठीची मळमळ होती, ती दिसली. हा फरक आहे. उद्धव ठाकरेंची माझ्यावर नेहमीच टीका सुरूच असते, पण त्यांच्या टीकेला, आरोपांना मी कामातून उत्तर दिलं, म्हणून जनतेला मला मुख्यमंत्री केलं आणि अडीच वर्षांत विधानसभेच्या निवडणुकीत मोठा जनादेशही दिला. पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदींनी त्यांना तत्काळ होकार दिला, मान्यता दिली त्या मोदींनाही त्यांनी आज सोडलं नाही, हे दुर्देवं आहे. त्यांची जी काही वृत्ती, द्वेष, पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे, ती दिसून आली.’’
तसेच ‘’मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता. तीन वर्षांपूर्वी २०२२ला आम्ही उठाव केला, आम्ही अन्यायाच्या विरुद्ध त्यावेळी उठलो, तेव्हा ते आडवे झाले होते. तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हे आजच्या भाषणातून माध्यमांनी देखील टिपलं असेल. जर मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. फ्लावर का फायर ते पुढच्या निवडणुकीत त्यांना कळेल.’’असंही शिंदेंनी बोलून दाखवले.
याचबरोबर ‘’लोकशाहीत कुणालाही कुणाबरोबर युती-आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशाजशा जवळ येतील, तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे त्या सगळ्यांना शुभेच्छा मी कालच दिलेल्या आहेत.’’ तर, ‘’राज ठाकरेंनी मराठीबद्दलची मनातील तळमळ बोलून दाखवली. परंतु झेंडा नको अजेंडा नको, दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला. त्यांच्या पोटातलं उठावर आलं. मराठी माणसाचा पूर्ण अपेक्षाभंग झाला.’’ असं शिंदे म्हणाले.
याशिवाय, ‘’आम्हाला वाटलं होतं की आधी येऊन माफी मागतील. कारण, हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच झालं होतं. त्यांनी तो डॉ. माशेलकरांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली होती. आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि हिंदीला स्थगिती देऊन टाकली. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश रद्द केले. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की, त्यांनी केलेल्या चुकीचं कुठंतरी परिमार्जन करण्यासाठी ते माफी मागतील. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार, कारण त्यांनी ते पूर्णपणे राजकीय व्यासपीठाचा आखाडा बनवला होता.’’ अशी टीका शिंदेंनी केली होती.
तर, ‘’बाळासाहेब ठाकरेंचे विचार २०१९मध्येच त्यांनी सोडले, म्हणून जनतेने त्यांना विधानसभेत धोपटलं, त्यांची जागा दाखवली आणि म्हणून तर आमचे ६० आमदार निवडून दिले. त्यांचे १०० लढवून २० आमदार निवडून आले. त्यांन हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचाराशी विश्वासघात त्यांनी केल्याने, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.