
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलींबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा सकारात्मक असा परिणाम दिसायला लागला आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलींबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा सकारात्मक असा परिणाम दिसायला लागला आहे. भारतातील लिंग गुणोत्तरात मोठा बदल झाला आहे. 2014-15 मध्ये जन्मावेळी प्रत्येक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 918 इतकं होतं. ते आता 2019-20 मध्ये वाढलं असून 934 वर पोहोचलं आहे. याची माहिती शनिवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने माहिती दिली.
भारत सरकारने या यशाचं क्षेय पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी अशा बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेला दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी या योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 ला केली होती. मोदी सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माबाबत समाजात असलेली मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सरकारने याबाबत ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
हे वाचा - नेताजींना काँग्रेसनं संपवलं; भाजप खासदाराचा गंभीर आरोप
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सांगितंल की, ज्या 640 जिल्ह्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना लागू केली त्यापैकी 422 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरात चांगला बदल दिसून आला आहे. देशातील अनेक जिल्हे असे आहेत जिथला बदल आश्चर्यचकीत करणारा आहे. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात 2015 मध्ये 694 इतकं लिंग गुणोत्तर होतं. ते आता तब्बल 951 इतकं झालं आहे. देशाच्या सरासरीपेक्षाही इथं मुलींचे प्रमाण जास्त वाढले आहे.
हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातसुद्धा असाच सकारात्मक बदल दिसला आहे. 2014-15 मध्ये एक हजार नवजात बाळांमागे 758 मुलींचा जन्म होत होता. तो आता 2019-20 मध्ये 898 इतका झाला आहे. हरियाणातील महेंद्रगढमध्ये हाच आकडा 791 वरून 919 झाला आहे. तर रेवाडी जिल्ह्यात 803 वरून 924 इतकं लिंग गुणोत्तर वाढलं आहे. पंजाबच्या पाटियाला इथंही मुलींचे प्रमाण वाढले असून 847 असलेलं लिंग गुणोत्तर 933 इतकं झालं आहे.
हे वाचा - Video: मोदी-ममता एका स्टेजवर, बोलणं तर दूरच एकमेकांकडे पाहणेही टाळलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. हरियाणातील पानीपत इथं 22 जानेवारी 2015 रोजी त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना सुरु करून एका बदलाच्या दिशेनं पाऊल टाकलं होतं. त्यांच्या या योजनेचे सकारात्मक असे परिणाम आता सहा वर्षांनी दिसत आहेत.
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान सुरु करण्यात आलं. त्यामुळे लोकांचे मुलींच्या जन्माबद्दल असलेले पूर्वग्रह कमी झाले. तसंच स्री भ्रूण हत्या संबंधित कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यात आली आणि शाळांमध्ये मुलींना योग्य संधी मिळेल यासाठी प्रयत्न केले गेले. महिला सक्षमीकरण करत असतानाच समान हक्क देणाऱ्या समाजाची निर्मिती होण्यासाठी यातून प्रयत्न केले गेले.