'आरोग्य सेतू'नंतर आता 'कोविन ऍप'; लशीविषयी मिळेल इत्त्यंभूत माहिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

लशीकरणाच्या नियोजनासाठी आता भारत सरकारने एक ऍप काढायचे ठरवले आहे. 

नवी दिल्ली : जगभरात लोक कोरोना व्हायरसच्या लशीची वाट पाहत आहेत. गेल्या एक वर्षापासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. युरोपातील अनेक राष्ट्रात सध्य दुसरी लाट आलेली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातदेखील दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र, येत्या दोन महिन्यात प्रभावी लस येईल, अशी शक्यता आहे. असं असलं तरीही संपूर्ण भारताचे लशीकरण होण्यास 2024 साल उजाडेल असं म्हटलं जातंय. या लशीकरणाच्या नियोजनासाठी आता भारत सरकारने एक ऍप काढायचे ठरवले आहे. 

हेही वाचा - नव्या संसदेचे भारतीय पद्धतीने सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद

भारत सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याची तयारी दर्शवली आहे. यादरम्यानच सरकारने कोविन ऍप नावाचे एक मोबाईल ऍप्लिकेशन आणण्याचीही तयारी दाखवली आहे. हे ऍप कोरोना व्हायरसच्या लशीसंदर्भात आहे. या ऍपमध्ये कोरोना लशीशी निगडीत प्रत्येक माहिती उपलब्ध असेल. केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या या ऍपमुळे कोणत्या व्यक्तीला लस मिळाली आहे, हे देखील समजेल. तसेच किती लस खरेदी केल्या गेल्या आहेत.  सोबतच किती शिल्लक आहेत, याची माहिती या ऍपद्वारे मिळेल. ज्याला कोरोनाची लस दिली जाणार आहे त्याला याबाबतची सूचना हे ऍप आधीच देईल. 

हेही वाचा - Post Covid complications : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई व्हेंटिलेटरवर!
कोविन ऍपबाबत केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की, या ऍपद्वारे डाटा अपलोड करण्यासोबतच डाटा प्राप्त करण्यामध्येही ते सहाय्यक ठरेल. याद्वारे प्रत्यक्ष मैदानात काम करणारे अधिकारी अधिक सक्षम  होतील. राज्य सरकारद्वारे केंद्र सरकारला कोरोना लशीचा डाटा उपलब्ध करुन देण्यामध्येही हे ऍप मदतनीस सिद्ध होईल. 
कोविन ऍपमध्ये आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय आणि आयुष्यमान भारत सारखे विभाग सामिल आहेत. कोविन ऍप एक लशीकरणाचे प्रमाणपत्र देखील निर्माण करेल. तसेच या प्रमाणपत्राला डिजीलॉकरमध्ये संग्रहित करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देईल. त्यामुळे पारदर्शकता अधिक येईल. तसेच शेवटच्या माणसापर्यंत लस पोहोचवण्याचं काम सोपं होईल. देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने पुन्हा जोर पकडला आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा दुसरी लाट येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi government plans to launch covin app for data bank of coronavirus vaccine