
Ramayana Circuit : काय आहे मोदी सरकारची रामायण सर्किट योजना, देशातील 'या' राज्यांना मिळणार स्थान
Ramayana Circuit : रामायण सर्किट ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतर्गंत सरकारला देशातील अशी सर्व ठिकाणांना जोडली जाणार आहेत, जिथे भगवान श्रीरामांचं वास्तव्य होतं. रामायण सर्किट योजनेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 9 राज्यांमध्ये 15 ठिकाणे चिन्हित केली आहेत. या योजनेतर्गंत ही सर्व शहरे रेल्वे, रस्ते आणि विमान प्रवासाद्वारे जोडली जातील.
दरम्यान, या योजनेतर्गंत विकासाचे प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाशी सल्लामसलत केल्यानंतर ठरवले जातात. त्याचबरोबर, शेजारील देशांशीही या योजनेच्या माध्यमातून कनेक्ट करण्याचा सरकारचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर मोदी म्हणाले की, रामायण सर्किटच्या विकासकामांना गती दिली जाईल.
रामायण सर्किट योजनेतील राज्ये
उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक ही देशातील रामायण सर्किटमध्ये येणारी राज्ये आहेत. अयोध्या, शृंगवरपूर, नंदीग्राम आणि चित्रकूट, बिहारचे सीतामढी, बक्सर, दरभंगा या प्रकल्पाचा भाग आहेत. यामध्ये मध्यप्रदेशचे चित्रकूट, छत्तीसगडचे जगदलपूर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे, ओडिशातील महेंद्रगिरी आणि तेलंगणातील भद्रचलन, तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि कर्नाटकातील हम्पी या दक्षिणेकडील राज्यांमध्ये रामायण सर्किट प्रकल्पाचा भाग बनवण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिक शहरांचाही समावेश करण्यात आला आहे. एकूणच पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत सर्व राज्यांना या प्रकल्पाचा भाग बनवण्यात आले आहे.
रामायण सर्किट प्लॅनमध्ये काय आहे?
रामायण सर्किट योजनेंतर्गत या सर्व शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था बळकट केली जाईल आणि त्याचवेळी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर दिला जाईल. निवडक 15 शहरांपैकी जिथे विमानतळ नाही अशा शहरांमध्ये नवीन विमानतळ बांधण्यात येणार आहे. सर्व शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडली जातील. रामायण सर्किटला भेट देणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय प्रयत्नशील आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी सरकार वेगाने काम करत आहे.
अयोध्येत शरयूच्या तीरावर रामाचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशात एकीकडे अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. त्याच बरोबर शरयूच्या तीरावर भगवान रामाची 250 मीटरची मूर्ती बसवण्याची तयारी सुरू आहे. प्रभू रामाच्या कांस्य मूर्तीची उंची 200 मीटर असेल आणि त्याच्या खाली 50 मीटर उंचीची पायाभूत इमारत बांधण्यात येणार आहे. यासोबतच येथे एक म्युझियम बांधण्यात येणार असून, त्यात रामकथेची माहिती दिली जाणार आहे. या संग्रहालयात यज्ञशाळाही बांधण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या उभारणीसाठी एकूण 225 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.