ही मोदी सरकारच्या पतनाची सुरवात : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 17 December 2019

जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोनिया गांधींनी निवेदन काढून मोदी सरकारवर हल्ला चढवला. "हिंसाचार आणि विभाजनाचे जनक मोदी सरकार असून सरकारमधील मंडळीच हिंसा घडवून आणत आहेत. सरकारचे काम घटनेच्या रक्षणाचे आहे.

नवी दिल्ली : "ईशान्य भारत पेटला असून, दिल्लीपासून ते पश्‍चिम बंगालपर्यंत हिंसा पसरली आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांची ईशान्य भारतातील राज्यांचा दौरा करण्याची हिंमत नाही,'' असा घणाघाती टोला कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लगावला. विद्यार्थ्यांविरुद्धची दडपशाही ही मोदी सरकारच्या पतनाची सुरवात आहे, असेही सोनियांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोनिया गांधींनी निवेदन काढून मोदी सरकारवर हल्ला चढवला. "हिंसाचार आणि विभाजनाचे जनक मोदी सरकार असून सरकारमधील मंडळीच हिंसा घडवून आणत आहेत. सरकारचे काम घटनेच्या रक्षणाचे आहे. भाजप सरकारने तर जनतेवरच हल्ला केला आहे. मोदी सरकार हिंसाचार आणि विभाजनाचे जनक बनले आहे. संपूर्ण देशाला विद्वेशाच्या गर्तेत ढकलले आहे. सरकारमध्ये बसलेली मंडळीच घटनेवर आक्रमण आणि तरुणांना मारहाण करत असतील, तर देश कसा चालणार?''

#IndiaGate : प्रियांका गांधी उतरल्या रस्त्यावर; इंडिया गेटसमोर आंदोलन!

"देशात अस्थिरता, हिंसा पसरवा, तरुणांचे हक्क हिरावून घ्या, धार्मिक उन्माद वाढवा आणि राजकीय लाभ घ्या, हा मोदी सरकारचा इरादा स्पष्ट आहे. याचे सूत्रधार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आसाम, त्रिपुरा, मेघालय पेटले आहे. पोलिसांच्या गोळीबारात आसाममध्ये चार जण ठार झाले; तर दिल्लीपासून पश्‍चिम बंगालपर्यंत हिंसा पसरली आहे. गृहमंत्री अमित शहा यांची ईशान्य भारतातील राज्यांचा दौरा करण्याची हिंमत नाही.''

देशातील विद्यार्थी बेरोजगारी, शुल्कवाढ, घटनेच्या विरोधात भाजपचे षड्‌यंत्र याविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परंतु, मोदी सरकारमधील मंत्री देशातील तरुणांना दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरवादी, देशद्रोही सिद्ध करण्यात व्यग्र आहेत. मोदी सरकार धार्मिक उन्माद, हिंसा वाढवून स्वतःच्या अपयशाकडून लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक याच विभाजनवादी धोरणाचा हिस्सा आहे. युवा शक्ती जागृत होते तेव्हा देशात नवा बदल होतो. भाजपच्या अहंकारातून आणि पोलिसांच्या लाठीमारातून विद्यार्थ्यांवर सुरू झालेली दडपशाही ही मोदी सरकारच्या पतनाची सुरुवात सिद्ध होईल, असा इशाराही सोनिया गांधींनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi govt has become creator of violence divisiveness says Sonia Gandhi