
Modi Govt : मोदीपर्व @ ९; खुला प्रवर्ग, ओबीसींचा भाजपच्या बाजूने कल
पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेत जात आणि आर्थिक वर्गात परस्पर संबंध प्रस्थापित करताना जमिनीची मालकी, संसाधनांची उपलब्धता, शिक्षण असे निकष लक्षात घ्यावे लागतात. या निकषांवर स्वाभाविकपणे उच्चवर्णीय समाज हा मागास, अतिमागास जाती - जमातींपेक्षा वरचढ राहिला आहे.
कृषी आणि शिक्षणात सहकार वाढला पण त्यामुळे जात रचनेत फरक पडला नाही उलट सहकारातून पुढे आलेल्या राजकीय रचनेतही उच्चवर्णीयांच्या प्राबल्याचे प्रतिबिंब दिसते. एकीकडे तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण झपाट्याने वाढत असताना सामाजिक रचनेत आणि त्याच्या राजकीय प्रतिबिंबात काही फरक पडला आहे का? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
केंद्रातील मोदी सरकारने नुकताच नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि नंतर शिवसेनेमध्ये फूट या दोन घटनांमुळे महाराष्ट्राच्या पक्षीय राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारच्या कारभाराकडे कसे बघते?
आणि आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना जनतेचे प्राधान्यक्रम काय असतील? याबद्दल ‘सकाळ’ने राज्यभरातून ४९ हजार २३१ मतदारांशी संवाद साधला. यामधून मोदी यांची लोकप्रियता ठळकपणे समोर आली पण त्याचबरोबर मतदानाच्या इतर प्राधान्यक्रमांवरही मतदार व्यक्त झाले आहेत.
२०१४ च्या निवडणुकीने पॅटर्न बदलला
लोकसभेची २०१४ ची निवडणूक अनेक अर्थाने राज्याच्या निवडणुकांचा पॅटर्न बदलणारी ठरली. त्यातली उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठेतर राजकारणाची ठळकपणे सुरुवात. पंतप्रधानपदाचा चेहरा असलेल्या मोदी यांनी जाहीरपणे आपण ‘ओबीसी’ समाजाचे प्रतिनिधित्व करतो असा प्रचार केला.
तत्कालीन भाजप-शिवसेना युतीचा पारंपरिक मतदार मराठेतर, इतर मागासवर्गीय अधिक राहिला. त्याला जसा भाजपचा ‘माधवं पॅटर्न’ हे एक कारण होते तसेच काँग्रेस - राष्ट्रवादीचे मराठा वर्चस्वही.
मतांच्या टक्केवारीतील फरक कमी
सर्वेक्षणात वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक गटातील मतदारांशी संवाद साधताना असे लक्षात येते की, सर्व आर्थिक गटातील खुल्या जात वर्गात (Open) आणि इतर मागासवर्गीय (OBC) समाजघटकांमध्ये मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे. इतर पक्षांच्या तुलनेत ही आकडेवारी लक्षणीयरित्या भाजपच्या बाजूने दिसते. सर्व आर्थिक गटातील मागासवर्गीय जमातींचा कल भाजपच्या बाजूने असला तरी भाजप आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीतील फरक तुलनेने कमी आहे.

मागासवर्गीयांचा कल काँग्रेसच्या दिशेने
मागासवर्गीय जातींचा (SC) कल सर्व आर्थिक गटात पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी होताना दिसते. या आकडेवारीत उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित होते. मात्र आकडेवारीवरून सरसकटपणे एका पक्षाची मते दुसऱ्या पक्षाच्या पारड्यात पडली आहेत असे चित्र दिसत नाही.
काँग्रेसला गरिबांचा पाठिंबा
आर्थिक वर्गवारीत आपण जसेजसे खालच्या स्तरात जातो तसा काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसतो. भाजपला पहिल्या क्रमांकाचा पसंती क्रम असला तरी भाजप आणि काँग्रेसला मिळालेल्या प्राधान्य क्रमातील तफावत कमी होताना दिसते. श्रीमंत आर्थिक स्तर वगळता सर्व आर्थिक स्तर आणि जातवर्गात राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळालेला आहे.
श्रीमंत गटात काँग्रेसला अधिक प्राधान्य असले तरी दोन पक्षांतील तफावत तुलनेने कमी आहे. सर्व आर्थिक स्तरातील अतिमागास जमातींच्या पसंती क्रमात भाजप आणि काँग्रेसमधील फरक इतर जातवर्गापेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. मध्यमवर्ग स्तरात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी पसंती मिळाल्याचे दिसते. दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीयांमध्ये काँग्रेस सर्वाधिक लोकप्रिय आहे.
ठाकरे गटाला पसंती
शिवसेनेतील दोन गटांपैकी उद्धव ठाकरे गटाला सर्व आर्थिक आणि जातीवर्गात अधिक पसंती मिळाल्याचे दिसते. अपवाद श्रीमंत अतिमागास जमातीचा. या आर्थिक जात वर्गात शिवसेनेला (एकनाथ शिंदे) उद्धव गटापेक्षा अधिक पसंती मिळाली आहे. तर याच जातवर्गातील मध्यमवर्ग आर्थिक गटात शिवसेना (एकनाथ शिंदे) फक्त एका टक्क्याने ठाकरे गटापेक्षा मागे आहे.

भाजपचा पारंपरिक मतदार कायम
सर्वेक्षणात भाजपचा पारंपरिक मतदार अजूनही कायम असल्याचे चित्र दिसते. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय उच्चवर्णीयांमध्येही पक्षाचा जनाधार लक्षणीय आहे. मात्र मागासवर्गीय जातींमध्ये काँग्रेसच्या तुलनेत भाजपचे घटलेले मताधिक्य त्यांच्याकडे राज्यस्तरावर सक्षम मागास नेतृत्वाचा असलेला अभाव ठळक करणारा आहे.
भाजपच्या केंद्रीय प्रचाराचा भर योजनांच्या लाभार्थी संवादाभोवती केंद्रित असूनही हा वर्ग काँग्रेसकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे लाभार्थी संवाद उपक्रमांतल्या त्रुटीवर काम करण्याचे आव्हान येत्या काळात भाजपसमोर असेल. विरोधी पक्षाला सामान्य माणूस हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनवावा लागेल.

मुख्यमंत्री शिंदेंसमोर आव्हानांचा डोंगर
राष्ट्रवादी काँग्रेसभोवती सध्या महाराष्ट्रात सगळी चर्चा केंद्रित झालेली असली तरी जनमतात मात्र कोणतीही लक्षणीय वाढ पक्षाच्या बाजूने दिसत नाही. उलट मध्यमवर्गीय जात वर्गात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी दिसते. सरंजामी पक्ष अशा प्रतिमेत गुरफटलेली पक्षाची प्रतिमा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षाचे मताधिक्य विभागले गेले आहे.
पारंपरिक मतदार ठाकरेंच्या बाजूने दिसतो आणि एकनाथ शिंदेसमोर येत्या काळात आव्हान अजून तीव्र होईल. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जातीगटांचा समतोल साधून पक्ष वाढ, नेतृत्व निर्माण करण्यात अजूनही शिंदेंना यश आलेले नाही हेच यातून दिसते.