इंदोरचे कंप्युटर बाबा गजाआड; भाजपने दिला होता राज्यमंत्री पदाचा दर्जा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

स्वयंघोषित गुरू नामवेददास त्यागी उर्फ कंप्युटर बाबा याच्या आश्रमावर रविवारी स्थानिक प्रशासनाने हातोडा फिरविला.

इंदूर- स्वयंघोषित गुरू नामवेददास त्यागी उर्फ कंप्युटर बाबा याच्या आश्रमावर रविवारी स्थानिक प्रशासनाने हातोडा फिरविला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सहा साथीदारांसह त्याला अटक करण्यात आली. येथून जवळ असलेल्या जाम्बुर्डी हप्सी खेड्यातील सुमारे दोन एकर सरकारी जमिनीवर त्यागीने अवैध बांधकाम तसेच अतिक्रमण केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. ४० एकर परिसरात पसरलेल्या या आश्रमाचे बाजारभावानुसार ८० कोटी मूल्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक महेशचंद्र जैन यांनी सांगितले की, अतिक्रमणादरम्यान कायद्यानुसार त्यागी व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.

दंड फक्त दोन हजार

महसूल खात्यातर्फे आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी केवळ दोन हजार रुपये दंड करण्यात आला होता, तसेच अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. आता या जागेवर गोशाळा आणि धार्मिक स्थळ उभारण्यात येईल असे सांगण्यात आले.

भगवान रामने जसं रावणाला हरवलं, तसं ब्रिटन कोरोनाला हरवेल- पंतप्रधान

राजकीय कोलांटउडी

२०१८ मध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यागीने शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारशी फारकत घेतली. नर्मदा नदीत अवैध वाळूउपसा सुरू असल्याचा आरोप त्याने केला होता. अलिकडेच पोटनिवडणूकीच्यावेळी त्याने लोकशाही बचाव आंदोलन छेडले होते. तेव्हा त्याने भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार गद्दार असल्याचा आरोप केला होता.

राज्य मंत्री पदाचा दर्जा

मध्य प्रदेशात आधीच्या भाजप सरकारने त्यागीला राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला होता. कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने नर्मदा नदी विकासासाठी स्थापन केलेल्या एका ट्रस्टचे अध्यक्षपद त्यागीकडे सोपविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp indor computer baba arrested by police