Vada Pav : जे बात! मुंबईच्या वडापावाला जागतिक मान्यता; 50 देशांच्या स्पर्धेत मिळाला मोठा मान l mumbai vada pav create world record history got 13th rank in all over world in 50 sandwiches | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vada Pav

Vada Pav : जे बात! मुंबईच्या वडापावाला जागतिक मान्यता; 50 देशांच्या स्पर्धेत मिळाला मोठा मान

Mumbai Vada Pav : मुंबईच गेलात आणि वडापाव खाल्ला नाहीत, असं शक्यच नाही. मुंबईच्या लोकलच्या धकाधकीत आणि जाम ट्रॅफिकच्या गर्दीत मुंबईकरांचा एवमेव सहारा म्हणजे वडापाव. मुंबईच्या वडापावची बातच निराळी. अगदी सिनेमांमध्येसुद्धा मुंबईचा सीन असेल तर वडापाव गाडी ही आवर्जून दाखवली जाते. वडापावच्या संदर्भात एक मोठी बातमी पुढे आली आहे. मुंबईच्या वडापावाला जगात मानाचं स्थान मिळालंय.

टेस्टऍटलास या वेबसाईटने जाहीर केलेल्या ५० बेस्ट सँडविचची यादीत मुंबईचा वडापाव १३व्या क्रमांकावर आहे.टेस्टऍटलास जाहीर केलेल्या यादीत तुर्कीचा टॉम्बिक पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे दक्षिण आफ्रिकेचा बुटीफारा आणि अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमो आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविच आहेत, ज्यात मुंबईच्या लाडक्या वडापावचा समावेश करण्यात आला आहे.

जगभऱ्यात मानाचं स्थान मिळवणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला बरं?

वडापावच्या जन्माची कहाणीही रंजक आहे. वडापावचा जन्म 1966 साली दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर झाला. याच दरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या.

त्यानंतर मुंबईच्या गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली.

आणि आता मुंबईकरांचा आवडता वडापाव अख्ख्या जगात प्रसिद्ध झालाय. मुंबईत अशी काही ठिकाणंसुद्धा आहेत जी फक्त वडापावासाठीच प्रसिद्ध आहे. जसे की अशोक वडापाव (किर्ती कॉलेज वडापाव), भाऊचा वडापाव (मुलुंड, पश्चिम), आनंद वडापाव (खाऊगल्ली), सम्राट वडापाव (जांबोरी मैदान), सारंग बंधू वडापाव (प्रभादेवी) यांचा समावेश होतो.

मुंबईला फिरायला गेले पर्यटक असोत किंवा मुंबईत धावपळ करत नोकरी वर जाणारा कर्मचारी वर्ग प्रत्येकाची भूक भागवणाऱ्या मुंबईच्या वडापावाचे जगात तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाल्याने जणू भावच वाढलेत.