Namaste Trump:फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या गिफ्टचं गुजरात, महाराष्ट्राशी कनेक्शन

namaste trump first lady melania will get gifts patola saree gujarat maharashtra
namaste trump first lady melania will get gifts patola saree gujarat maharashtra

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. भारत दौऱ्यात मेलानिया ट्रम्प यांना भारतातील प्रसिद्ध पटोला साडी भेट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पटोला साडी ही गुजरातमधील पाटणची प्रसिद्ध आणि महिलांमध्ये लोकप्रिय साडी आहे. ही रेशमी साडी पूर्णपणे हाताने तयार केली जाते. पाच-सहा कारागिरांना ही साडी तयार करण्यासाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागतो. यात वापरल्या जाणाऱ्या रंगात कोणतेही रसायन नसते. वनस्पतीपासून खास प्रक्रिया करून नैसर्गिक रंग तयार करून ते पटोलात वापरले जातात. पटोलाचे कापड फाटले तरी त्याचा रंग कधीही उतरत नाही. 

लाखात किंमत 
हाताने तयार होणाऱ्या या साडीची किंमत दीड लाखापासून सहा लाखांपर्यंत असते. ही साडी विणण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. तसेच, त्याच्या डिझाइनसाठी संगणकाचाही वापर केला जात असल्याने तिची किंमत लाखांत असते, अशी माहिती पटोलाचे कारागीर राहुल साळवी यांनी दिली. संपूर्ण भारतात केवळ गुजरातमधील पाटण येथेच ही साडी तयार केली जाते. तेथे पटोला विणणारे केवळ पाच कारागीर उरले आहेत. त्यांची कोणतीही कंपनी नाही. सर्व कारभार आगाऊ नोंदणीवर चालतो. 

एकच कारागीर कुटुंब 
पटोलाची कला ही ९०० वर्षांपासून चालत आली आहे. या साडीला देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही मागणी असते. पटोला तयार करणारे साळवी हे एकच कुटुंब पाटणमध्ये आहे. या कुटुंबातील ३० पिढ्यांनी ही कला जतन केली आहे. या हस्तकलेसाठी या कुटुंबाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एकेकाळी ही साडी इंडोनेशिया आणि मलेशियात निर्यात केली जात असे. आता मात्र नोंदणी आल्यानंतर साडी तयार केली जाते. साडी तयार केल्यानंतर वरून रंग न लावता रंगीत धाग्यांनी विणली जाणारी ही एकमेव साडी आहे. हे या साडीचे वैशिष्ट्य आहे. यामुळेच ही साडी तयार करण्याची प्रक्रिया जटिल आहे. यातील एक जरी धागा इकडे-तिकडे झाला तरी संपूर्ण साडी खराब होते. 

पटोलाचे मूळ जालन्यात 
पाटणच्या पटोला साडीला ९०० वर्षांचा इतिहास आहे. १२व्या शतकात सोलंकी वंशातील राजा कुमारपाल पूजा करताना पटोलाचा वापर करीत होते. त्या वेळी पटोला महाराष्ट्रातील जालना येथे तयार होत असे. राजा कुमारपालने जालन्याहून ७०० पटोला कारागिरांना पाटणला कायमस्वरूपी वास्तव्याचे निमंत्रण दिले आणि तेव्हापासून पाटणमध्ये पटोलाची परंपरा सुरू झाली. 

इंदिरा गांधीही साडीच्या प्रेमात 
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही या साडीचे आकर्षण होते. त्यांनी ती पाटणहून खास तयार करून घेतली होते. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटणहून अनेकदा साडी मागविली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com