Namaste Trump:डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात 'ते' उद् घाटन होणारच नाही!

टीम ई-सकाळ
Friday, 21 February 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्‍या स्वागताप्रीत्यर्थ होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन नव्याने बांधलेले मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

वॉशिंग्टन : भारताच्या दौऱ्यात अमेरिका आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करार होणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, योग्य प्रस्ताव न आल्यास याबाबतची चर्चा थंडावेल, असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, ट्रम्प यांच्या दौऱ्याची भारतातच नव्हे तर, जगभरात उत्सुकता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्टेडियमचे उद्घाटन नाहीच!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्‍या स्वागताप्रीत्यर्थ सोमवारी (ता.२४) होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन नव्याने बांधलेले मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या हस्ते या संकुलाचे उदघाटन होणार नाही, असे स्पष्टीकरण ‘द गुजरात क्रिकेट असोसिएशन’ने (जीसीए) शुक्रवारी दिले. मोटेरा येथील क्रिकेटचे स्टेडियम हे जगातील सर्वांत मोठे आहे. एक लाख दहा हजार प्रेक्षक सामावू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. ‘‘या कार्यक्रमाचे शीर्षक ‘नमस्ते ट्रम्प’ असे आहे. म्हणजेच हा कार्यक्रम ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित केला आहे. स्टेडियमचे उदघाटन आम्ही नंतर करणार आहोत,’’ असे ‘जीसीए’चे उपाध्यक्ष धनराज नाथवानी यांनी आज सांगितले.

आणखी वाचा - कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी त्यानं लग्न पुढं ढकललं अन् 

आणखी वाचा - नमस्ते ट्रम्प सभेसाठी एक कोटी नागरिक येणार 

ट्रम्प काय म्हणतात? 
लास वेगास येथील कैद्यांच्या पदवीदान समारंभात ट्रम्प यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी, ‘‘आम्ही भारतात जात आहोत आणि तेथे आम्ही मोठ्या प्रमाणावर करार करणार आहोत,’’ असे सांगितले. आम्ही अमेरिकेचा विचार आधी करीत असल्याने त्यांच्याकडून योग्य प्रस्ताव आले, तरच आम्ही करार करू; अन्यथा ही चर्चा मागे पडेल. निवडणुकीनंतरच आम्ही त्यावर विचार करू. लोकांना आवडो वा ना आवडो, आमचे पहिले प्राधान्य अमेरिकेला आहे,’’ असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या जगभरातील व्‍यापाराच्या तुलनेत सेवा व वस्तू क्षेत्रात अमेरिका आणि भारतातील द्विपक्षीय कराराचे प्रमाण तीन टक्के आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump will not inaugurate motera cricket stadium gujrat