धक्कादायक! दिल्लीत आंदोलनातील शेतकरी नेत्यांना संपवण्याचा कट

delhi farmers protest leader khalistani
delhi farmers protest leader khalistani

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून शेतकरी नेत्यांना टार्गेट करण्याचा आंतरराष्ट्रीय कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कटामागे खलिस्तान कमांडो फोर्सचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. रॉ आणि इतर गुप्तचर संस्थांनी केसीएफच्या कटाबद्दल माहिती दिली आहे. 

गुप्तचर संस्थांनी म्हटलं की, केसीएफने दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकरी नेत्यांना टार्गेट करण्याचा कट आहे. केंद्र सराकरच्या दोन गुप्तचर संस्था रॉ आणि आयबीने याबाबतचा अहवाल तयार केला आहे. दोन्ही संस्थांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधून केसीएफला संपवण्यात आघाडीवर असलेला शेतकरी नेता टार्गेटवर आहे. 

काही दिवसांपूर्वी एका अशाच प्रकरणी गुप्तचर संस्थांनी अहवाल तयार केला होता. यानुसार, कट रचणारे बेल्जियम आणि ब्रिटनमधील आहेत. त्यांचा असा प्लॅन आहे की, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांना हटवण्यात येईल. केसीएफने विचार केला होता की, सध्या शेतकरी नेत्याची हत्या झाली तर भारतात हिंसाचार होईल. याचा आरोपसुद्धा सरकारी संस्था किंवा एका राजकीय पक्षावर लावला जाईल. 

खलिस्तान कमांडो फोर्स ही एक दहशतवादी संघटना आहे. भारतात होणाऱ्या अनेक हत्या प्रकरणांमध्ये या संघटनेचा हात आहे. जगभरात कॅनडा, ब्रिटन, बेल्जियम आणि पाकिस्तानचे लोक या संघटनेत सहभागी आहेत. 

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीच्या आधीही गुप्तचर संस्थांनी सरकारला सावध केलं होतं. काही बाहेरचे लोक आंदोलनात गोंधळ माजवू शकतात आणि हिंसा भडकावतील अशी शक्यता व्यक्त केली होती. यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी गोंधळ झाला आणि आंदोलक लाल किल्ल्यावर पोहोचले होते. या रॅलीत समाजकंटक घुसल्यानं शेतकरी आंदोलनाचे पावित्र्य नष्ट झाल्याचा आरोपही कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनात गोंधळ माजवणे आणि हिंसाचार भडकवणाऱ्या पोस्ट करत असल्यानं पाकिस्तानातून चालवण्यात येणारी 400 हून अधिक ट्विटर हँडल डिलिट करण्यात आली होती. भारतीय तपास संस्थांनी यावर आक्रमक भूमिका घेत ट्विटरला कारवाईचा इशारा दिला होता. 

दिल्लीत सुरु असलेल्या या शेतकरी आंदोलनाला आता तीन महिने पूर्ण होत आले आहेत. अद्याप शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणताच तोडगा निघालेला नाही. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर असलेली शेतकरी आंदोलकांची संख्या कमी होत आहे. असे असले तरीही शेतकरी संघटनांनी मात्र आंदोलन बराच काळ चालेल असा दावा केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com