
भारताचे चीन आणि पाकिस्तानसोबत संबंध ताणलेले असतानाच आणखी एका शेजारी राष्ट्राशी संबंध चिघळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारताचे चीन आणि पाकिस्तानसोबत संबंध ताणलेले असतानाच आणखी एका शेजारी राष्ट्राशी संबंध चिघळण्याची शक्यता आहे. भारताच्या लिपुलेखमध्ये मानसरोवर लिंक रोड कामाचे उद्घाटन केल्यामुळे नेपाळ नाराज आहे. भारताशी लागून असलेल्या सीमेवर नेपाळ सैन्याची संख्या वाढवणार असल्याचा इशारा नेपाळकडून भारताला देण्यात आला आहे. यामुळे भारत-नेपाळ सीमा प्रश्न चिघळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नेपाळ सरकारने म्हटले की, सुगौली करारानुसार, काली नदीच्या पूर्वेकडील भाग, लिंपियादुरा, कालापानी आणि लिपुलेख हा नेपाळचा भाग आहे. नेपाळ सरकारने याआधीदेखील अनेक वेळेस नवीन राजकीय नकाशा जाहीर करण्यावर भारत सरकारला कळवले होते. मात्र, ठोस भूमिका भारताकडून आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. लिपुलेखमध्ये भारताने केलेले बांधकाम हे दोन्ही देशातील मैत्री संबंधाच्या विरोधात असल्याचेही वक्तव्य नेपाळने केले आहे.
जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण
दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या मार्गाच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते. नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी सांगितले की, भारत सरकारकडून सीमा प्रश्न सोडवण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली जात आहे. नेपाळ सरकारने उपस्थित केलेल्या प्रश्नांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताने नेपाळच्या हद्दीतील लिपुलेखमध्ये रस्ता बांधला असल्याचे नेपाळ सरकारला कल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताला लागून असलेल्या सीमेवर नेपाळ सरकार फौजा वाढवणार असल्याचेही ग्यावली यांनी सांगितले. दरम्यान, भारताने नेपाळचे आरोप फेटाळून लावले असून भारताच्या हद्दीत बांधकाम सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.