
चॉकेलट आवडत नसेल असा एखादाच व्यक्ती असू शकतो. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच जवळपास चॉकलेटप्रेमी असतात. आता चॉकलेट प्रेमींसाठी चॉकलेटच्या नव्या वर्जनची भर पाडत किटकॅट घेऊन येतंय चॉकलेटचं नवं वर्जन. ज्याचं नाव विगन चॉकलेट असं सांगितल्या जातंय. यूकेसह 15 युरोपीय देशांमध्ये ‘विगन किटकॅट’ लाँच करण्याची योजना सुरु आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, क्लासिक किटकॅटच्या विगन व्हर्जनमध्ये दुधाला पर्याय म्हणून तांदुळाच्या घटकांचा दुधाला पर्याय म्हणून वापर केला जाणार आहे. चॉकलेटचा हा नवा फॉर्मुला विकसित होण्यासाठी दोन वर्षे लागली आहेत.
चॉकलेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ
नेस्लेच्या युरोपमधील कन्फेक्शनरी प्रमुख कॉरीन गॅबलर म्हणाले की, ‘आमच्याकडे 10 पैकी चार ग्राहक असे आहेत जे म्हणतात की, त्यांना विगन आहाराकडे वळायचे आहे. त्यामुळे आता ही चॉकलेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असू शकते.’ विगन चॉकलेट मार्केटची किंमत सध्या 533 दशलक्ष डॉलर इतकी आहे आणि येत्या 10 वर्षांत ती दुप्पट ते 1.4 बिलियन डॉलर होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी नेस्लेने चाचणीदरम्यान काही बाजारांमध्ये या विगन किटकॅटची विक्री सुरु केली. इतर किटकॅटची किंमत ही 60 ते 70 पेन्स (भारतीय किंमत 55 ते 65 रुपये) दरम्यान होती, तर KitKat Vची विक्री 90 पेन्स (85 रुपये) ठेवण्यात आली होती. गॅबलर म्हणाले की, कंपनी किंमतीतले हे अंतर शक्य तितके कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आता नेस्लेला KitKat V कडून खूप अपेक्षा असून, अधिक उत्पादनासाठी 300 टनांपासून सुरुवात करत आहोत, असे गॅबलर म्हणाले. युरोपमध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार टन किटकॅट प्रोडक्ट विकले जातात, त्यांच्याशी याची तुलना होणार आहे. मात्र, सध्या KitKat V ची किंमत इतर चॉकलेटपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनासाठी येणारा अधिकचा खर्च.