नेताजींच्या जयंतीनिमित्त मोदींचा लूक चर्चेत; फोटोने मोडला विक्रम

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही कार्यक्रमात, दौऱ्यांमध्ये अनेकदा त्यांच्या पेहरावामुळे चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या लूकची चर्चा सातत्याने होत आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही कार्यक्रमात, दौऱ्यांमध्ये अनेकदा त्यांच्या पेहरावामुळे चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या लूकची चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच आता पश्चिम बंगाल दौऱ्यातील त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी काढलेल्या एका फोटोने तर विक्रमच केला आहे. 

जगात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये मोदी आघाडीवर आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या कार्यक्रमांचे, उद्घाटन समारंभातील फोटो पोस्ट करत असतात. कोलकात्यातील कार्यक्रमातील त्यांच्या एका फोटोने विक्रम मोडला आहे. 20 तासांच्या आतच या फोटोला 10 लाख लोकांनी लाइक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यात पोहोचल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते कोलकात्याला गेले होते. 

कोलकात्यात गेल्यानंतर मोदींनी फेसबुकवर फोटो शेअर केला होता. विमानातून ते बाहेर पडताना दिसत आहेत. यामध्ये साधा कुर्ता आणि पायजमा घातलेल्या मोदींनी अंगावर शालही घेतली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, नेताजींना अभिवादन करण्यासाठी कोलकात्यात पोहोचलो आहे.

हे वाचा - मोदी सरकारच्या योजनेनं करून दाखवलं; देशात मुलींचा जन्मदर वाढला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल इथं झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक बंगाली चित्रपट कलाकारांसोबत चाय पे चर्चा केली होती. चित्रपट क्षेत्रातील सूत्रांनी दिलेला माहितीनुसार त्यांनी अभिनेता रुद्रानिल घोष, इंद्राणी हल्दर, प्रसेनजित चॅटर्जी यांच्याशी चर्चा केली. 

हे वाचा - नेताजींना काँग्रेसनं संपवलं; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आय़ोजित पराक्रम दिवस समारंभात मोदींनी भारताचे कोरोना विरोधातील लढाईतील योगदानाचं कौतुक केलं. जगभरातील देशांना भारत लस पुरवत असून याचा नेताजींना अभिमान वाटला असता असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेत देशातील प्रत्येकजण सहभागी झाले आहे आणि आता जगातील कोणतीच शक्ती भारताला आत्मनिर्भर होण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: netaji jayanti pm modi look photo viral on social media