नव्या भाजपाध्यक्षांसाठी आता फेब्रुवारीचा मुहूर्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जानेवारी 2020

‘सीएए’साठी जनसंपर्क मोहीम
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या (सीएए) घरोघर जनसंपर्क मोहीमेसाठी पक्षाने नितीन गडकरी, राजनाथसिंह, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस अशा ४२ नेत्यांना देशभरातील राज्ये व शहरे वाटून दिली आहेत. ‘‘राहुल गांधी, ममतादीदी, केजरीवाल यांच्या दुष्प्रचाराला उत्तर देण्यासाठी आपल्या मोबाईलवरून ८८६६२-८८६६२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सीसीएबाबत मोदींना पाठिंबा द्यावा,’’ असे भाजपने म्हटले आहे. घरोघरी जाणाऱ्यांत जावडेकरांच्या जोडीला शहा स्वतः दिल्लीतच तळ ठोकून राहतील.

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहांऐवजी अन्य नेत्याची नियुक्ती आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे आव्हान अन्य भाजप नेत्यांना झेपण्यासारखे नाही हे लक्षात आल्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः सत्तारूढ पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यामुळेच पक्षाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त या निवडणुकीनंतरचा काढणे भाजपला भाग पडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पी संसद अधिवेशनाचा पूर्वाध फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संपल्यावर लगेचच यासाठी भाजपची राष्ट्रीय बैठक होईल, अशा हालचाली आहेत. दरम्यान सध्याच्या जहाल नेतृत्वाच्या जागी मवाळ स्वभावाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याऐवजी सर्वांना चकीत करणारा एखादा तरुण चेहरा पक्षाध्यक्षपदी आणून पंतप्रधान त्यांचे प्रसिद्ध धक्कातंत्र वापरू शकतात, अशीही चर्चा आहे. जन्मापासून अस्सल ‘दिल्लीकर’ असे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला आजतागायत मिळालेले नाहीत, याकडेही पक्षनेते लक्ष वेधतात. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

भाजपच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक निवडणुका मकर संक्रांतीनंतर सुरू होतील. पक्षाच्या घटनेनुसार ५० टक्के प्रदेश पक्षशाखांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करता येत नाही. या वेळेस अध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट आहे. यासाठी नड्डा यांच्याच नावाची तूर्त चर्चा असली, तरी भाजपच्या एका गटाच्या मतानुसार ऐनवेळी नड्डा यांच्याऐवजी वेगळा व तुलनेने तरुण चेहरा समोर आणण्याचे पक्षनेतृत्वाच्या मनात घोळत असावे. एका माजी भाजप नेत्यांच्या चिरंजीवांच्या वरिष्ठ वर्तुळातील ‘प्रवेशा’बाबत शहा ‘साहीब’ फारच आशावादी असल्याचेही सांगितले जाते. याची चुणूक शहा यांनीच दिल्लीच्या प्रचारादरम्यान दिल्याचेही मानले जाते. लोकसभा किंवा एकादी विधानसभा निवडणूक सुरू असण्याच्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे भाजपने सातत्याने टाळले आहे. साहजिकच दिल्ली निवडणुकीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दिल्लीत घेतली जाईल असे दिसते. नड्डा हेच पुढील अध्यक्ष होणार असतील, तर संबंधित नेत्याला प्रथम कार्याध्यक्षपदी नेमण्याची चाल खेळण्यात येऊ शकते.  

भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम

दिल्ली निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे प्रकाश जावडेकर यांच्याकडे आली असून, पक्षाचे राज्य प्रभारी श्‍याम जाजू हेही मराठीच आहेत. मनोज तिवारी बिहारी, तर अन्य बहुतांश नेते पंजाबी पार्श्‍वभूमीचे आहेत. तरीही दिल्लीची लढाई केजरीवाल यांच्याशी आहे व ती सोपी नाही, हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New bjp president selection in february politics