गाडीच्या शोधात एकाकी अडवानी...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जुलै 2017

वेंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदासाठी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अर्ज दाखल केला तेव्हा अडवानी तेथे हजर होते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सारे नेते तेथून पांगले. अडवानी एकटेच फिरत क्रमांक चारच्या दरवाजातून बाहेर पडले आणि एकटेच चालू लागले व संसदेतून बाहेर आले.

नवी दिल्ली: "माझी गाडी आलेली नाही. मी माझी गाडी शोधतो आहे,' असे म्हणत दिल्लीतील भर दुपारच्या टळटळीत उन्हात एका वयोवृद्ध नेत्याची हातावर हात ठेवून संसद भवनाच्या या दारापासून त्या दारापर्यंत चालेलली भटकंती आज उपस्थितांना अक्षरशः चटका लावून गेली... हे ज्येष्ठ म्हणजे भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी होते! आज विजयाच्या सोनेरी क्षणांत न्हाणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या या सुवर्णयशाचा भक्कम पाया घालणारे अडवानी यांची कारकिर्दीच्या सायंकाळी झालेली ही सैरभैर अवस्था पाहणाऱ्यांच्या मनात "...जो तो पाठ फिरवी मावळत्या' या कवी भा. रा. तांबेंच्या ओळीचा मारवा रूंजी घालू लागला नसता तरच नवल...

वेंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदासाठी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अर्ज दाखल केला तेव्हा अडवानी तेथे हजर होते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सारे नेते तेथून पांगले. अडवानी एकटेच फिरत क्रमांक चारच्या दरवाजातून बाहेर पडले आणि एकटेच चालू लागले व संसदेतून बाहेर आले. पण तेथे त्यांना त्यांची वाहने दिसेनात. ते तेथे काही वेळ थांबले. नंतर चालत क्रमांक तीनच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. मात्र ते लोकसभा सभापतींसाठीचे दार असल्याने सभापती संसदेत गेल्यावर बंद केले गेले होते.

क्रमांक दोनचे दारही आज सुरक्षा यंत्रणेने बंद केले होते. ही बंद दारे पाहत पाहत अडवानी चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले. तेथे थोडावेळ थांबून ते पुन्हा क्रमांक चारच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तथापि त्यांना आपला वाहनांचा ताफा कोठे गेला हे मात्र समजत नव्हते. भाजपच्या किरकोळ खासदारांच्या व मंत्र्यांच्या आलीशान गाड्या तेथून जा-ये करत होत्या; पण एकालाही अडवानी आज संसदेबाहेर व भर उन्हात असे एकटेच का फिरताहेत, हे पाहण्यासाठी क्षणभरही थांबण्याचे सुचले नाही!
तेथील काही कॅमेरामन-पत्रकारांनी अडवानींना क्रमांक चारच्या प्रवेशद्वारसमोरील प्रसारमाध्यम कक्षात नेले. ते तेथे बाकावर विसावले. त्यांच्याबरोबरच्या पत्रकारांनी राष्ट्रपती निवडणुकीसह अनेक विषयांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी अडवानींमधल्या "स्टेट्‌समन'ने आपले चिरपरिचित मौन सोडले नव्हते.

एव्हाना कोणीतरी अडवानींचे सहायक दीपक चोप्रा यांना फोन केला व ते धावतपळत त्या ठिकाणी पोचले. त्यांनी अडवानींना हाताला धरून गाडीत बसविले व भाजपचे हे भीष्माचार्य आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले... निःशब्दपणे!

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news bjp lal krishna advani