नववर्षाच्या उत्साहाला आवर घाला

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 31 December 2020

इंग्लंडला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या नव्या अवताराने भारतातही चंचुप्रवेश केल्यामुळे यंत्रणा सावध झाल्या आहेत.नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात संसर्गाच्या प्रसाराला संधी मिळू नये यासाठी राज्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्राने दिले.

नवी दिल्ली - इंग्लंडला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या नव्या अवताराने भारतातही चंचुप्रवेश केल्यामुळे यंत्रणा सावध झाल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात संसर्गाच्या प्रसाराला संधी मिळू नये यासाठी राज्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्राने दिले.

भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २५ हजारांपेक्षाही कमी होती मात्र आज २० हजारांहून अधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. अशात इंग्लंडमधून आलेला कोरोनाचा नवा अवतार ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचेही लक्षात आल्याने रुग्ण संख्या वाढू शकते. त्यापार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अमेरिका आणि युरोपातील वाढता संसर्ग पाहता खबरदारी घेण्याची गरज असल्याचे केंद्राने राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  नववर्षाचे आगमन आणि स्वागत कार्यक्रम पाहता संभाव्य संसर्ग वाढविणारे सुपर स्प्रेडर कार्यक्रम तसेच अशा ठिकाणांबाबत राज्य सरकारांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवासी आणि मालवाहतुकीवर निर्बंध घालण्यात येऊ नये असेही निर्देशांत म्हटले आहे.

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! करा 8 तास काम आणि ओव्हरटाईमसाठी घ्या दुप्पट पैसे

ब्रिटनसोबतची हवाई सेवा बंदच
ब्रिटनहून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व विमानांवरील बंदी केंद्र सरकारने उद्यापासून (ता.३१) आणखी आठवडाभरासाठी म्हणजे ७ जानेवारीपर्यंत (गुरुवार) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मुलकी विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

4 पैकी 2 मुद्द्यांवर सहमती; शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्र्यांची माहिती

वीस जणांना बाधा
ब्रिटनमधून भारतात आलेल्या वीस प्रवाशांना कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याआधी सहाजणांमध्ये हा विषाणू आढळून आला होता. दरम्यान हा नवा विषाणू डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर या देशांत पोचला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Year Celebration Corona Virus Health Care