सुनियोजित काम करणारी भाजपची 'हेट फॅक्टरी'; सोशल मीडियावरच्या 'हिंदू इकोसिस्टीम'चा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली 'हिंदू इकोसिस्टीम'ची उभारणी करण्यात आली असून तिचं काम कशापद्धतीने चालतं, याची सविस्तर आणि धक्कादायक अशी माहिती न्यूजलाँड्रीने आपल्या रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे. 

नवी दिल्ली : देशात हिंसक, द्वेषमूलक आणि धर्मांधतेचं वातावरण असल्याची तक्रार हल्ली सातत्याने ऐकू येताना दिसते. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा 'हिंदुत्वा'च्या आवरणाखाली मोठ्या प्रमाणावर दुहीचं बीज आणि द्वेषाचं विष सातत्याने पेरुन त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. देशात कुठलीही घटना घडली तरीही तिला सरतेशेवटी याप्रकारेच वळण मिळतं की 'हे देशद्रोह्यांकडून घडवलं जात आहे आणि हे हिंदुविरोधी कारस्थान आहे.' मोदी सरकार सत्तेत आल्यापासून खासकरुन सोशल मीडियावरुन याच प्रकारचा सुनियोजित असा सत्तापुरस्कृत प्रोपगंडा दिवसरात्र चालवला जातो आहे, असा आरोप विरोधक करतात. यासंबंधीचा एक रिपोर्ट न्यूजलाँड्रीने काल 15 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केला आहे. भाजपने देशात हे द्वेषमूलक वातावरण सातत्याने टीकवण्यासाठी म्हणून एक दिर्घ अशी सुनियोजित यंत्रणाच उभी केल्याचे हा रिपोर्ट सांगतो. Hate factory: Inside Kapil Mishra’s ‘Hindu Ecosystem’ असं या रिपोर्टचे नाव आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली 'हिंदू इकोसिस्टीम'ची उभारणी करण्यात आली असून तिचं काम कशापद्धतीने चालतं, याची सविस्तर आणि धक्कादायक अशी माहिती न्यूजलाँड्रीने आपल्या रिपोर्टमधून उघडकीस आणली आहे. 

हेही वाचा - उत्तराखंडमध्ये RSS ची मदत; फोटो शेअर केल्यानं परेश रावल ट्रोल

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलन, ट्रॅक्टर रॅली हिंसाचार, तांडव वेबसिरीज, ग्रेटा-रिहाना-मिया खलिफा ट्विट, ग्रेटा टूलकिट या आणि अशा अनेक विषयांवर या इकोसिस्टीममधून पद्धतशीरपणे कॅम्पेन चालवण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक विषयाबाबत हिंदूत्ववादी, सरकारला अनुकूल अशा पद्धतीने फेक न्यूज पसरवून प्रोपगंडा चालवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं हा रिपोर्ट सांगतो.

काय आहे हा रिपोर्ट?
16 नोव्हेंबर 2020 रोजी म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी 'हिंदू इकोसिस्टीम' उभारण्याविषयी ट्विट करुन लोकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी एक फॉर्म भरण्याचे आवाहन केलं होतं. या हिंदू इकोसिस्टीममध्ये न्यूजलाँड्रीच्या काही पत्रकारांनी प्रवेश करुन ती प्रत्यक्षात अथवा 'ऑनलाइन यंत्रणा' कशी चालते याचा शोध घेतला. तेंव्हा त्यांना आढळलं की, या इकोसिस्टीमची प्रमुख कामे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. भाजप सरकारविरोधातील प्रत्येक आवाज मोडून काढणे
  2. खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवणे
  3. मुस्लिम, काँग्रेस, ख्रिश्चन, पाकिस्तान आणि सत्ताविरोधी प्रत्येक घटकाला लक्ष्य करुन पद्धतशीरपणे विरोध करणे
  4. अत्यंत सुनियोजित पद्धतीने सरकारसमर्थक असा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करुन प्रोपगंडा तयार करणे
  5. 'हिंदू खतरे में है' ही भावना सातत्याने ताजी ठेवून आक्रमक, हिंसक आणि द्वेषमूलक मजकूराचा प्रसार आणि प्रचार करणे
  6. थोडक्यात, ही इकोसिस्टीम कशी चालते, याचा सविस्तर आढावा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

कोण आहेत कपिल मिश्रा?
कपिल मिश्रा हे आधी आम आदमी पक्षाकडून आमदार राहिले आहेत. ते आता भाजपचे नेते आहेत. 23 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर दिल्लीच्या भागात उसळलेल्या दंगलीसाठी कपिल मिश्रा यांनी केलेलं चिथावणीखोर भाषण कारणीभूत ठरलं, असा त्यांच्यावर आरोप होता. मात्र, दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी त्यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. या दंगलीत सुमारे 53 जणांचा मृत्यू  झाला असून अनेक जण जखमी झाले होते. ग्रेटा थनबर्ग यांच्या टूलकिटबाबतची माहिती देखील सर्वांत आधी कपिल मिश्रा यांनीच आपल्या ट्विटरवर टाकून त्याबाबत सर्वांचे लक्ष वेधलं होतं. ते आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newslaundry report exposed Hindu Ecosystem of Kapil Mishra spreading hate & bigotry in nation