'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतोय, 'प्रदूषणामुळे आयुष्य घटलंय; मग फाशीला अर्थ काय?'

पीटीआय
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- निर्भया प्रकरणातील दोषींची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका 

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील नराधमांना फासावर लटकाविण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर तयारी केली जात असताना, याच प्रकरणातील एक दोषी अक्षयकुमार सिंह याने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका सादर केली . सध्या दिल्लीतील हवा आणि पाणी विषारी होऊ लागले असून, यामुळे व्यक्तीचे सरासरी आयुर्मानदेखील कमी होऊ लागले आहे. राजधानीमध्ये अशी स्थिती असेल तर मृत्युदंडाच्या शिक्षेला अर्थच काय, असा सवाल त्याने या याचिकेच्या माध्यमातून केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधिज्ञ ए. पी. सिंह यांनी आज अक्षयच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बलात्कार झाला तेव्हा अक्षय हा दिल्लीमध्ये नव्हता. तो त्याच्या बिहारमधील मूळ गावी म्हणजे औरंगाबादेत होता, असा दावाही विधिज्ञ सिंह यांनी केला. याचा पुरावा म्हणून त्यांनी अक्षयच्या बसची तिकिटेदेखील न्यायालयासमोर मांडली. याच प्रकरणातील आणखी एक दोषी रामसिंह याचा तिहार तुरुंगामध्ये झालेला मृत्यूदेखील आत्महत्या नसून, तो खून असल्याचा दावा सिंह यांच्याकडून करण्यात आला. 

जल्लाद फाशी देण्यापूर्वी कैद्याच्या कानात म्हणतो की...

फाशीची तयारी सुरू 

निर्भयाप्रकरणातील सर्वच दोषींना लवकरच फाशीची शिक्षा होऊ शकते. तिहार तुरुंगामध्ये याची तयारी सुरू झाली असून, याच प्रकरणातील आणखी एक दोषी असणाऱ्यास मांडोली येथून नुकतेच तिहार तुरुंगामध्ये हलविण्यात आले आहे. आता तिन्ही नराधम एकाच तुरुंगात आहेत. फाशीसाठी वापरला जाणारा दोरखंड विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. सध्या बिहारच्या बक्‍सर कारागृहामध्ये या दोरखंडाची निर्मिती सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Rape Case Convict Akshay Kumar Singh Files Review Petition In Supreme Court