esakal | बस खरेदीच्या घोटाळ्याचा आरोप; गडकरींच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

स्वीडिश एसव्हीटी या वृत्तसंस्थेनं नागपूर बस खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं वृत्त दिलं आहे. यामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाची कंपनी असल्याचं म्हटलं आहे.

बस खरेदीच्या घोटाळ्याचा आरोप; गडकरींच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - स्वीडिश एसव्हीटी या वृत्तसंस्थेनं नागपूर बस खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं वृत्त दिलं आहे. यामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाची कंपनी असल्याचं म्हटलं आहे. स्वीडनमधील बस निर्मिती करणारी स्कॅनिया कंपनी आणि गडकरींच्या मुलाची कंपनी यांच्यात हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. स्कॅनिया कंपनीने केलेल्या चौकशीमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. एखादं काम करण्यासाठी लाच किंवा दुसरं काम करून घेतल्याचा हा प्रकार असल्याचंही म्हटलं आहे.

स्कॅनियाने त्यांच्या कंपनीच्या बस भारतात विकण्यासाठी लाच देऊ केली होती. 2013 ते 2016 या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता. देशातील 7 राज्यांमध्ये या बसेसची विक्री झाली होती असं एसव्हीटीने म्हटलं आहे. भारतात स्कॅनियाने 2007 मध्ये काम सुरु केलं होतं. तर त्यानंतर पुढच्या चार वर्षांत देशात बस तयार करणारा कारखानाही उभारला होता. 

हे वाचा - आत्मनिर्भर भारतामागे भगवद्गीतेची प्रेरणा; PM मोदींनी लाँच केलं गीतेचं किंडल व्हर्जन

स्कॅनिया कंपनीच्या ऑडिटरना कंपनीने कामाच्या बदल्यात भारतातील परिवहन मंत्र्याला एक लक्झरी बस भेट दिल्याचं आढळून आलं होतं. याची माहिती स्कॅनियाने त्यांच्या फोक्सवॅगन ला कळवली. स्कॅनियाची मूळ मालकी या कंपनीकडे आहे. स्वीडनमध्ये एसव्हीटीसह जर्मन वृत्तसंस्था झेडडीएफनेसुद्धा याबाबतच वृत्त प्रसारित केलं आहे. 

एसव्हीटीने म्हटलं आहे की, 2016 मध्ये एक लक्झरी बस स्कॅनिया कंपनीच्या एका डिलरकडून गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आली. याच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीच्या काही बसेस भाड्यानं किंवा विकत घेण्यात आल्या. असंही म्हटलं जातं की ही बस गडकरींच्या मुलीच्या लग्नावेळी वापरण्याात आली. 

हे वाचा - स्वीडनच्या स्कॅनियाने बस करारासाठी भारतीय अधिका-यांना दिली ‘लाच’; वाहनाच्या कागदपत्रांत केला फेरफार

दरम्यान, गडकरी यांच्या कार्यालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मीडियाने रंगवलेल्या बातम्या असल्याचं त्यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. माध्यमांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, 2016 च्या नोव्हेंबरमध्ये स्कॅनिया कंपनीची लक्झरी बस भारतात आली. यात गडकरींच्या मुलाचा संबंध असल्याचं सांगितलं आहे. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांचे कोणत्याही प्रकारे बस खरेदीशी देणं घेणं नाही.
 

loading image