नितिश कुमार यांना धक्का; जेडीयुच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

nitish kumar jdu
nitish kumar jdu

पाटणा- जेडीयुचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बिहारमधील सत्ताकारणातील त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपने त्यांना धक्का देत अरूणाचल प्रदेशातील जेडीयुचे सहा आमदार फोडले आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाचे एकूण 7 आमदार अरूणाचल प्रदेशमध्ये निवडून आले होते. त्यापैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

शनिवारी पाटण्यात जेडीयुची राष्ट्रीय परिषद होणार असल्याने त्यापूर्वी या आमदारांनी पक्ष सोडल्याने नितीश यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपने या परिषदेआधीच जेडीयुतील आमदार फोडून नितीश कुमार यांना सुचक संदेश दिला आहे. दुसऱ्या पक्षातील आमदार सोबतीला घेऊन आपले सरकार आणि पक्षाची सदस्य संख्या वाढवायची असेल तर भाजप सहकारी किंवा विरोधक असा कोणताही फरक करत नसल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले आहे. 

जेडीयुकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसून भाजपकडून केल्या गेलेल्या या कृत्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध खराब होतील असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. जेडीयुचे नेते भाजपवर कमालीचे नाराज असून यामुळे बिहारमधील सत्ताकारणात भाजपचे वजन वाढले आहे. अरूणाचल प्रदेशातील आमदार फोडल्याने त्याचा थेट फायदा भाजपला बिहारमध्ये होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे. याआधीही जेडीयुच्या नागालँडमधील एकुलत्या आमदाराला फोडून तेथील मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षात घेतले होते.  

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयुच्या राजकीय संबंधांमध्ये मोठे बदल झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने जेडीयुपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र, भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील हे स्पष्ट केले होते. मात्र, भाजपच्या वाढत्या जागांमुळे त्यांचा तेथे साहजिकच दबदबा वाढला होता. त्यामुळे अरूणाचल प्रदेशात भाजपने केलेल्या कुरापतीमुळे नितीश कुमारांच्या गृह राज्यातील राजकारणावरही परिणाम होईल का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com