Delhi Election 2020 : 'भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढणे तर...'; राजनाथ सिंहांचे मोठे वक्तव्य

वृत्तसंस्था
Thursday, 30 January 2020

विरोधी पक्षांनी द्वेषाचे राजकारण करत 'सीएए'विषयी गैरसमज पसरविला आहे. काही ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. मात्र, भाजप धर्माच्या आधारावर कधीही राजकारण करत नाही.

Delhi Election 2020 : नवी दिल्ली : सध्या दिल्ली विधानसभांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. संरक्षणमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनीही दिल्लीच्या आदर्शनगर भागात रॅली काढली. यावेळी त्यांनी देशातील मुस्लिमांबद्दल एक वक्तव्य केल्याने सगळ्यांच्या नजरा वळाल्या आणि कान टवकारले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रॅलीवेळी उपस्थितांना उद्देशून राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)बद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या कायद्यामुळे भारतीय नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. मी देशातील मुस्लीम बांधवांना वारंवार हेच सांगत आलो आहे की, तुम्ही आम्हाला मतं द्या किंवा देऊ नका; परंतु आमच्या कामावर आणि देशहिताबद्दल असलेल्या गोष्टींवर कधीही अविश्वास दाखवू नका. 

- 'ये लो आझादी' म्हणत जामियाबाहेर त्याने केला गोळीबार

ते पुढे म्हणाले, ''जे मुस्लीम बांधव हे भारताचे नागरिक आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच त्यांना हानी पोहोचवण्याचा कोणताही उद्देश या कायदा लागू करण्यामध्ये नाही. तुम्हाला देशातून हाकलून काढणे तर दूर तुम्हाला कुणी हातदेखील लावणार नाही, याची मी ग्वाही देतो.''

दिल्लीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकेल याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला, पण अविश्वास आणि कपटनीतीच्या आधारावर विजय मिळवून आम्हाला सत्तेत यायचं नाही, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. 

- मोदी आणि नथुराम एकाच विचाराचे : राहुल गांधी

दिल्लीच्या कोडोली विधानसभा मतदारसंघात आयोजित रॅलीवेळी राजनाथ सिंह म्हणाले, सीएए च्या मुद्द्यावर अनेकजण राजकारण करत आहेत. मात्र, त्यांना यामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मी विरोधी पक्षांना हे सांगू इच्छितो की, त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका जरूर सांभाळावी, पण राष्ट्रधर्म आणि राष्ट्रहिताला बाधा पोहोचेल, असे काही करू नये. 

तसेच विरोधी पक्षांनी द्वेषाचे राजकारण करत 'सीएए'विषयी गैरसमज पसरविला आहे. काही ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. मात्र, भाजप धर्माच्या आधारावर कधीही राजकारण करत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

- INDvsNZ : सामना मी नाही, शमीने जिंकवला : रोहित शर्मा

आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले, ''पाणी, वाहतूक आणि मोफत वाय-फाय देण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरले आहे. ते फक्त मोफत पाणी आणि वीज देत असल्याची ओरड करत आहेत. पण आमच्या इमानदारीची किंमत कोणीही करू शकत नाही. कारण तो भारतीयांचा आत्मसन्मानाचा भाग आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Indian Muslim will be affected by CAA says Defence minister Rajnath Singh