esakal | वाढत्या 'लव्ह जिहाद'वर कोश्यारींशी चर्चा; महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

rekha sharma with governor.

आपण या  पदावर राहून कट्टर आणि द्वेषाच्या मानसिकतेचा पुरस्कार कशा काय करु शकता? असा सवाल त्यांना विचारला जातोय. 

वाढत्या 'लव्ह जिहाद'वर कोश्यारींशी चर्चा; महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. आयोगाने यासंदर्भात ट्विट करुन माहीती दिली आहे. मात्र आता हे ट्विट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या ट्विटमध्ये राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर चर्चा झालेल्या विषयांमध्ये 'लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ' हा विषयदेखील असल्याचं लिहलं आहे. यावरुन अनेक ट्विटर युझरनी त्यांना प्रश्न विचारले आहेत, तसेच त्यांना पदावरुन पायउतार होण्याचीही मागणी केली आहे. 

महिला आयोगाच्या या ट्विटमध्ये म्हटलंय की, आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये राज्यातील महिलांची छेडछाड, विनयभंग, कोरोना सेंटरमधील महिला रुग्णांवरील बलात्कार आणि लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ अशा महिला सुरक्षेशी संबधित विषयांवर चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा - भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकाला रात्री पाठवले परत

महिला आयोगाच्या या ट्विटनुसार, रेखा शर्मा यांनी दावा केलाय की, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या प्रकरणात वाढ झाली आहे. लव्ह जिहाद हा शब्द उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून वापरला जातो आणि या शब्दांमागील त्यांचा आरोप असा आहे की मुस्लिमांकडून हिंदू महिलांना फसवून त्यांचं धर्मांतर करुन त्यांच्याशी लग्न केलं जातं. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यपालांशी भेट घेतल्यावर या लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणावर देखील चर्चा केल्याचं म्हटलं आहे. 

यावर अनेक लोकांनी आक्षेप घेत रेखा शर्मा यांना पदावरुन पायउतार व्हा, अशी टीका केली आहे. आपण या  पदावर राहून कट्टर आणि द्वेषाच्या मानसिकतेचा पुरस्कार कशा काय करु शकता? असा सवाल त्यांना विचारला जातोय. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींचे भाषण फ्लॉप; भाजपने डिस्लाईक बटण केले ब्लॉक!

ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुईमेन्स असोशिएशनच्या सेक्रेटरी कविता क्रिश्नन यांनी याबाबत रेखा शर्मा यांच्यावर या पदावर बसण्याचा आपल्याला अधिकार नसल्यांची टीका केली आहे. लव्ह जिहाद म्हणजे काय? जिथं एक मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री प्रेमात आहेत, त्याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणाल? ज्या महिलांचा वापर मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवण्यासाठी करतात त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची हिंमतच कशी करावीशी वाटते? असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटरवर केला आहे.