कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी कलेक्टरवरच हत्येचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी कलेक्टरवरच जर गुन्हा दाखल झाला तर?

ओडीसा : कलेक्टर हा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी जबाबदार असा प्रशासकीय व्यक्ती मानला जातो. जिल्ह्यातील प्रशासनाच्या सुशासनाला तो जबाबदार असतो. मात्र, एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी कलेक्टरवरच जर गुन्हा दाखल झाला तर? हो असं घडलंय ओडीसामध्ये. कोर्टाच्या आदेशानुसार, पोलिसांनी मलकानगिरी जिल्ह्याचे कलेक्टर मनिष अग्रवाल यांच्यावर त्यांचे खाजगी सहाय्यक नारायण पांडा यांच्या हत्येच्या आरोपाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - 7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; नितीश कुमार यांचा सातव्यांदा शपथविधी
फक्त कलेक्टर अग्रवालच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी दोन कर्मचारी आणि एक निवृत्त कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाटा एंट्री ऑपरेटर व्ही वेणू, स्टेनोग्राफर प्रकाश स्वैन आणि माजी महसूल अधिकारी भगवान पानीग्रही यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गेल्या रविवारी दिली. मलकानगिरीच्या उपविभागिय न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मलकानगिरी शहराच्या बाहेर असलेल्या सतिगुडा धरणाजवळ पांडा यांचा मृतदेह 28 डिसेंबर 2019 रोजी सापडला होता. 

मृत पांडा यांची पत्नी बनाजा पांडा यांनी कोर्टामध्ये असा दावा केला होता की कलेक्टरच्या वतीने लाच घेण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे.  एफआयआरमध्ये त्यांनी असा दावा केला होता की, पांडा यांच्यावर कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना पदावरून काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ‘निधी’ गोळा करण्याचे काम वेणू यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

हेही वाचा - स्वदेशी लस भारत बायोटेकची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; 26 हजार व्हॉलेंटीअर्स होणार सहभागी
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे, असे मलकनगिरी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राम प्रसाद नाग यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींवर कलम 302 (हत्येची शिक्षा), 506 ( धमकी देण्याची शिक्षा), 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे), 204(पुरावेनष्ट करणे), 120 ( बी) (गुन्हेगारी कट रचण्याची शिक्षा) आणि आयपीसीचे 34 (34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले कृत्य)) असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Odisha collector & office staff booked in murder case