esakal | दिल्लीमध्ये आता ऑक्सिजनच्या कमतरतेचे गंभीर संकट

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder
दिल्लीमध्ये आता ऑक्सिजनच्या कमतरतेचे गंभीर संकट
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केजरीवाल सरकारने सहा दिवसांचा लॉकडाउन लावल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नावच न घेणाऱ्या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये आता ऑक्सिजनच्या कमतरतेचे गंभीर संकट उद्भवले आहे. सर गंगाराम, लोकनायक जयप्रकाश,, मौलाना आझाद , मॅक्स, अपोलो, जीटीबी, लेडी हार्डिंग, इरविन तसेच सेंट स्टिफन्स यांसारख्या बहुतांशी रूग्णालयात केवळ काही तास पुरेल इतकाच ऑक्‍सिजन उपलब्ध आहे, असे आज अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

दिल्लीच्या रुग्णालयांना वेळेवर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला नाही तर अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

राजधानी दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा भीषण तुटवडा जाणवतो आहे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राकडे वारंवार केली आहे. मात्र या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता तूर्त दिसत नाही. दिल्लीच्या वाटेचा ऑक्‍सिजन केंद्रातील मोदी सरकार इतर राज्यांकडे वळवीत असल्याचा जाहीर आरोप राज्य सरकारने केलेला आहे. आज दिल्लीमध्ये सलग सातव्या दिवशी विक्रमी हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळल्यानंतर देशाच्या या राजधानीतील ऑक्सिजनच्या भीषण दुष्काळाची वस्तुस्थिती चव्हाट्यावर आली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी होणार 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी; बायडन यांनी दिलेलं निमंत्रण

राजधानी दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये आपल्या रुग्णालयात केवळ दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे, असे सध्या किमान साडेतीनशे रुग्णांवर उपचार करणाऱ्या सेंट स्टिफन्स रुग्णालयाच्या प्रशासनाने आज दुपारी सांगितले. आपल्या रुग्णालयांकडे येणारे ऑक्सिजनचे टॅंकर केंद्र सरकारच्या ‘एम्स’सारख्‍या रुग्णालयांकडे परस्पर वळवले जात असल्याचा गंभीर आरोप अनेक खासगी रुग्णालयांनी केला आहे आणि याच रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण ऑक्सिजनच्या खाटेवर आहेत. मॅक्स रुग्णालयाने काल (ता. २०) रात्री कळकळीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पातळीवर धावाधाव झाली आणि केंद्र सरकारकडून कसेबसे ऑक्सिजनचे सिलिंडर मिळाले. मात्र हा पुरवठा आज संध्याकाळपर्यंतच पुरेल असे या रुग्णालयाने स्पष्ट केले. केजरीवाल यांनी नायब राज्यपालांबरोबर ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत तातडीची चर्चा केली. सर गंगाराम रुग्णालयात केवळ काही तास पुरेल इतका ऑक्‍सिजन बाकी आहे आणि येथे किमान ५० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ‘होली फॅमिली’चे संचालक फादर जॉर्ज यांनी सांगितले की, जर आज रात्रीपर्यंत ऑक्सिजन मिळाला नाही तर या रुग्णालयातील चारशे कोरोना रुग्णांचे प्राण धोक्यात येऊ शकतात.

हेही वाचा: कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

ऑक्सिजन कोटा वाढविला

राजधानीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असतानाच केंद्र सरकारने आज दिल्लीचा ऑक्सिजन कोटा वाढविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच ट्विटरवरून ही माहिती जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.

कोर्टाने फटकारले

ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले. ‘वास्तव परिस्थितीनंतरही सरकार इतके शांत कसे बसू शकते. ऑक्सिजन नाही म्हणून तुम्ही लोकांना मरण्यासाठी सोडून देऊ शकत नाही. आदेश देऊनही औद्यगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनसाठी परवानगी दिली जाते. तुम्हाला उद्योगांची काळजी आहे, लोकांच्या जीवाची नाही. हे संतापजनक आहे. मानवी जीवांचे काहीही महत्त्व नाही का?’, असे ताशेरे न्यायालयाने मारले.